लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी शहरातील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये चुरस आहे. महिला अध्यक्षपदासाठी माजी सभागृह नेत्या मंगला कदम, माजी महापौर अपर्णा डोके, महिला बाल कल्याण समितीच्या माजी अध्यक्षा अनुराधा गोफणे यांच्या नावामध्ये चूरस आणि चर्चा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता गेली पंधरा वर्षे होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावर येथील सत्ता चालायची़ मात्र, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीची सत्ता उलथून लावली. पवारांच्या मुशीत तयार झालेल्या आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांनी भाजपाशी सलगी केल्याने राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्यांमुळेच अपयश आले. एकमुखी सत्ता जाऊन विरोधी पक्षात बसण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे. निवडणुकीनंतर गेल्या दोन महिन्यांत अजित पवार यांनी पिंपरीला भेट दिलेली नाही. विकास करून अपयश कसे? याची कारण मीमांसा राष्ट्रवादी करीत आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर शहरातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकांवर प्रभागांची जबाबदारी सोपविली होती. संततुकारामनगर विभागाची जबाबदारी माजी महापौर योगेश बहल यांच्यावर होती. याच प्रभागात राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुजाता पालांडे यांनीही उमेदवारी मागितली होती. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्फतही आपल्या नावाची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, पॅनेलमध्ये घेतले नाही पालांडे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला.
महिलाध्यक्षांसाठी चुरस
By admin | Published: May 15, 2017 6:40 AM