चाकण : सीआयडी पोलीस असल्याची बतावणी करून एका भामट्याने रस्त्याने जाणाऱ्या एका भाजीपाला विक्रेत्याला लुटल्याची घटना पुणे -नाशिक महामार्गावर घडली. विक्रेत्याकडील दोन तोळ्यांची चेन व अंगठी हातचलाखीने चोरुन भामट्याने दुचाकीवरून पोबारा केला. याप्रकरणी दोन अनोळखी इसमांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना आज दि. ३१ रोजी पुणे-नाशिक महामार्गावर झगडे वस्तीवर घडली. याबाबतची फिर्याद प्रकाश किसन कारले (वय ४७, रा.चाकण ) यांनी दिली आहे. प्रकाश हे शेतकरी असून ते चाकण बाजारात भाजीपाला विकून उपजीविका करतात. आज सकाळी बाजारातून घरी जाताना दुचाकीवरून आलेल्या एका इसमाने त्यांना हटकले व मी सीआयडी पोलीस आहे, असे सांगून लांबून ओळखपत्र दाखविले. पुढे साहेब असून अंगावर दागिने ठेवू नकोस, खिशात ठेव असे सांगून तोतया पोलिसाने खिशातील रुमाल काढून कारले यांच्या हातातील अर्धा तोळ्याची अंगठी व गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन काढून घेतली. रुमाल बांधून देताना हातचलाखीने त्यातील दागिने घेऊन दुसºया अज्ञात इसमास झडती घेऊन पोलीस ठाण्यात जाण्याचा बहाणा करून दुचाकीवरून पोबारा केला. सदरचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला असून छायाचित्र स्पष्ट दिसत नाही. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.