पुणे : सर्वसामान्य नागरिकांच्या किचन मधील कोथिंबीर गायब झाली आहे. रविवारी गुलटेकडी मार्केटयार्डमधील तरकारी विभागात कोथिंबिरीच्या अवघ्या ४० हजार गड्ड्यांची आवक झाली. यामुळे रविवार (दि.७) रोजी घाऊक बाजारामध्ये कोथिंबिरीला दर्जानुसार २५ ते ५० रुपये दर मिळाले. तर शहराच्या विविध भागात किरकोळ व्यापा-याकडे कोथिंबिरीची हीच गड्डी तब्बल ८० रुपयांच्या पुढे गेली. तर मेथी, मुळा, कांदापातसह अन्य सर्व पालेभाज्यादेखील सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. जिल्ह्यात सर्व भागात जोरदार पाऊस झाल्याने हाताशी आलेला शेतमाल खराब झाला आहे. यामुळे आवक मोठ्या प्रमाणत घट झाली आहे. यामध्ये सर्वांधिक फटक कोथिंबीर पिकाला बसला आहे. त्यात मागणी अधिक आणि आवक कमी झाल्याने कोथिंबीरीचे दर गगनाला भिडले आहेत. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मधील तरकारी विभागात गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांची आवक निम्म्यावर आली आहे. उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली होती. जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पाऊस लागून राहिल्याने हाताशी आलेला शेतमाल पाण्यात गेला. यामुळे आवक खूपच कमी झाली आहे. त्या तुलनेत शहर, परिसरातून मागणी जास्त आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे भाव तेजीत आहेत. -----------------गुजरातची ‘सटाणा’ कोथिंबीरी पुणे जिल्ह्यात बहुतेक सर्वच भागात सर्वांधिक पाऊस झाल्याने येथे येणारी गावरान व वासाची कोथिंबीर तर बाजारामध्ये अत्यंत तुरळक प्रमाणात येते आहे. परंतु सध्यस्थिती गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये गुजरात येथील ‘सटाणा’ जातीची कोथिंबीरीची मोठी आवक होत आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांश शेतक-यांकडून कोथिंबीरीची आता लागवड करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात कोथिंबिरीची जास्त आवक होईल. सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे भाव घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात वाढले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर पालेभाज्यांचे दर खाली येतील अशी शक्यता आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी व्यक्त केली.
रविवारी गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील पालेभाज्याचे घाऊक बाजारातील दर (शेकडा गड्डी) कोथिंबीर : २५००-५०००, मेथी : १५००-२५००, शेपू : १०००-१५००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : १०००-१५००, करडई : ५००-८००, पुदिना : ३००-८००, अंबाडी : १०००-१५००, मुळे : १५००-२०००, राजगिरा : १०००-१२००, चुका : ८००-१०००, चवळई : ८००-१२००, पालक : ५००-८००.