- नम्रता फडणीस पुणे - गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'फिल्म बाजार' विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘गिरकी’या मराठी चित्रपटाची निवडकरण्यात आली आहे. . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागात सहाय्यक प्राध्यापक असलेले अमित सोनवणे वकवयित्री कविता दातीर या व्दयींनी ‘गिरकी’चे लेखन-दिग्दर्शन केले असून, निर्माता गणेश वसंत शिंदे हे पुणेस्थित उद्योजक असून, ‘गिरकी’हा निर्माताम्हणून त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. दरवर्षी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'फिल्म बाजार' या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. त्यानुसार याचित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमली जाते. यावर्षी एकूण २९ चित्रपटांचे प्रस्ताव आले होते. समितीने केलेल्याशिफारसीनुसार ‘गिरकी’हा मराठी चित्रपट शासनातर्फे निवडण्यात आला आहे.
यासोबत बटरफ्लाय व ग्लोबल आडगाव या दोन चित्रपटांचीही निवड करण्यात आली आहे. निवड समितीत ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे, दिग्दर्शक प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज, कॅमेरामन समीर आठल्ये, अभिनेता संदीप पाटील यांचा समावेश होता. यापूर्वीही महाराष्ट्र शासनाचा अधिकृत फिल्म फेस्टिवल असलेल्या पिफ म्हणजे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये २०२३ रोजी ‘गिरकी’ची स्पर्धेसाठी निवड झाली होती. गिरकीने ‘बेस्ट डिरेक्टर ज्युरी मेन्शन’हा पुरस्कार पटकावला होता.‘गिरकी’हा ९५ मिनिटे लांबीचा चित्रपट आहे. प्रमुख भूमिकेत सुयश झुंझुरके व प्रमित नरके आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण रोशन मरोडकर , संकलन अमित सोनावणे, म्युझिक सारंग कुलकर्णी व साऊंड डिजाईन हे नॅशनल अवॉर्ड विजेते महावीर साबण्णावर यांनी केलं आहे. २०१४ साली कविता दातीर यांनी ‘बबई ’नावाची शॉर्ट फिल्म बनवली होती. या शॉर्ट फिल्मचे जगभरातील चाळीसहून अधिक फेस्टिवल्समध्ये स्क्रीनिंग करण्यात आले. विविध फेस्टिवल्समध्ये पुरस्कारही मिळाले. त्याचबरोबर, तेलंगण राज्यामधील 'टूवर्ड्स अ वर्ल्ड ऑफ इक्वल्स : अ बायालिंग्वल टेक्स्टबुक ऑन जेंडर' या पदवी व अभियांत्रिकीच्या शासकीय महाविद्यालयांच्या विषयाच्या अभ्यासक्रमात 'बबई' या माहितीपटाचा समावेश करण्यात आला.लेखक-दिग्दर्शक कविता दातीर यांचा 'कविताच्या कविता' हा काव्य संग्रह २०१३ साली अक्षर मानवने प्रकाशित केला. ‘रात्र कडूझार होती..’हा आगामी कविता संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे.