पुणे: पुण्यातील चित्रपटगृह, सांस्कृतिक केंद्र आणि नाट्यगृहांना येत्या एक डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहील. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
मागील काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून जिल्ह्यातील पहिली ते सातवीच्या शाळा देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मागील काही दिवसांपासून 50 टक्के क्षमतेने सुरू असणारे शहरातील नाट्यगृह आणि चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी परवानगी देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
नव्या व्हेरिएंटच्या मुकाबल्यासाठी सज्ज-दरम्यान शहरातील निर्बंध हटवले जात असते तरी कोरोनाच्या नव्या व्हेंरिएंटसाठी आपण सज्ज असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो हॉस्पिटलबाबत 31 डिसेंबर रोजी परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विमानतळावरील तपासणी बंद-
इतर राज्यातून विमानाने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची यापुढे विमानतळावर कोरोना बाबतच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार नसल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही पुण्यात पोहोचलेल्या प्रवाशाला विमानतळावरही तपासणीसाठी दोन ते अडीच तास रांगेत थांबावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत होता. हे सर्व टाळण्यासाठी बाहेरून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाणार असल्याचेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या बाबतीत केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन केले जाईल, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले..