पुणे : औंध येथे चोरट्यांना पाहून पोलीस पळून गेल्याच्या घटनेनंतर आता कोथरुडमधील एका सोसायटीत दरोडा टाकण्यासाठी शिरलेल्या सहा जणांच्या टोळक्यांपैकी दोघांना नाईट राऊंडवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करुन धाडसाने पकडले. चोरट्यांकडे हत्यारे असतानाही पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात जाऊन या अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक करुन त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.
बल्लुसिंग प्रभूसिंग टाक आणि उजालासिंग प्रभूसिंग टाक (दोघे रा. रामटेकडी, वानवडी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या कटावण्या, लहान मोठ्या धारदार सुर्या, कटर, एक कार, दरोडा टाकून मिळविलेले दागिने, एक घड्याळ जप्त करण्यात आले आहे. बल्लुसिंग याच्यावर ६३ आणि उजालासिंग याच्यावद ७२ गुन्हे प्रलंबित आहेत. याबाबतची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी दिली.
असा घडला थरारपौड रोडवरील राजा शिवराय प्रतिष्ठान शाळेजवळील पंचरत्न सोसायटीत ६ चोरटे शिरले असल्याची माहिती पहाटे २ वाजून २० मिनिटांनी पोलिसांना समजली. त्याबरोबर रात्रपाळीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके व कोंडाजी धादवड हे ४ ते ५ मिनिटात घटनास्थळी पोहचले. त्यावेळी चोरट्यांनी इमारतीचा वीजपुरवठा खंडित केला होता. तिसर्या मजल्यावर बॅटरीचा झोत दिसत होता. हे पाहून शेळके व धादवड हे पार्किंगच्या जागेतच वाहनामागे लपून चोरटे खाली उतरण्याची वाट पाहू लागले. वरुन चोरटे आल्याबरोबर या दोघांनी त्यांच्यातील एकावर झडप घालून बल्लुसिंग टाक याला पकडले. त्याचवेळी इतर पोलीस सोसायटीजवळ पोहचले होते. एकाला पकडल्यानंतर इतर चौघे पळून जाण्यास यशस्वी ठरले. तेथून पळून जाणार्या उजालासिंगवर त्यांची नजर पडली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. उजालासिंग याच्या हातात धारदार चाकू होता. त्याने पळून जाताना पोलीस पाठलाग करताहेत म्हटल्यावर पुन्हा मागे येऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न करीत होता. त्यांच्यावर दगडे फेकत होता. पोलीसही कारबाईन लोड करुन थांब नाही तर गोळी घालेल, असे दरडावत होते. तरीही तो तसाच पुढे जात त्याने पौड रोड ओलांडला. तेथून तो समोर असलेल्या अंजठा सोसायटीची भिंत ओलांडून आत गेला. त्याच्या पाठलागावर असलेल्या पोलिसांना पुढे सोसायटी चारही बाजूने बंद असल्याचे माहिती असल्याने ते त्याच्या पाठोपाठ आत गेले. शेवटच्या भिंतीवरुन तो वर चढू लागल्यावर त्याच्या हातातील हत्यार खाली पडले. ही संधी साधून पोलिसांनी त्याचे पाय धरुन त्याला खाली खेचत जेरबंद केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, निरीक्षक बाळासाहेब बडे, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर सांगुर्डे, स्वप्निल गायकवाड, वैभव शिंदे, दत्ता चव्हाण, मनोहर कुंभार, सुरज सपकाळे, विकास मरगळे, गणेश भाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सेफ पुणे इन अॅक्शन मोडजानेवारी महिन्यात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औंध येथे घरफोडी करणार्या चोरट्यांची माहिती मिळाल्यावर नाईट राऊंडवरील पोलीस रायफलसह तेथे गेले होते. त्यावेळी चोरट्यांना पाहून पोलिसांनी पळ काढला होता. या घटनेमुळे पोलिसांना टिकेचे धनी व्हावे लागले होते. हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना जिव्हारी लागला होता. तंत्रज्ञानाची कामात जोड देऊन रात्रपाळीच्या गस्तीमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आले. सेफ पुणे इन अॅक्शन मोड अॅप विकसित करण्यात आले होते. त्यामुळे रात्रगस्तीत सकारात्मक बदल घडले. त्यामुळेच या कारवाईच्या वेळी पोलीस पाचव्या मिनिटाला पोहचले......चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनेनंतर जानेवारी २०२१ मध्ये गस्तीवरील पोलिसांच्या कार्यपद्धतीत आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले. त्याचाच फायदा या कारवाईच्यावेळी दिसून आला. पोलीस पाचव्या मिनिटाला घटनास्थळी पोहचले होते. त्यामुळे आरोपींना पाठलाग करुन पकडण्यात यश आले.अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त