पुण्याच्या आंबिल ओढा परिसरातील झोपडपट्ट्यांवर आज सकाळपासून अतिक्रमण कारवाईला सुरुवात झाली आहे. यावरून नागरिक प्रचंड आक्रमक झाले असून काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिस्थिती चिघळली आहे. नागरिक आणि पोलिसांमध्ये कारवाईच्या ठिकाणी धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. नागरिकांचा प्रचंड विरोध होत असूनही पालिका मात्र कारवाईवर ठाम आहे.
पुण्याचा दांडेकर पुलालगत असलेल्या वस्तीतल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरत असल्याने गेल्यावर्षी नंतर महापालिकेने मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेत नागरिकांना इथून हटवायची तयारी केली होती. आज सकाळी ७ वाजताच अतिक्रमण कारवाईसाठी पथक या वस्तीत दाखल झाले.
पण नागरिकांनी या कारवाईला विरोध केल्याने इथली परिस्थिती चिघळली आहे.अनेक नागरिकांनी इथे आंदोलन केलं. काहींनी आत्मदहन देखील करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कोणतीही सूचना न देता केवळ बिल्डर्सच्या फायद्यासाठी ही कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कारवाई पूर्वी पुनर्वसन का करण्यात आलं नाही असा सवाल विचारत नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.