जुन्नर : कुकडी प्रकल्पांतर्गत जुन्नर तालुक्यातील धरणात असलेला पाणीसाठा, त्यातून करण्यात येणारा विसर्ग हा कळीचा मुद्दा बनला असतानाच शनिवारी (दि. ३0) मणिकडोह धरणातून पाणी सोडण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत पाणी सोडण्यास विरोध केला. शनिवारी रात्री माणिकडोह धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने जलसंपदा विभागातर्फे नियोजन करण्यात येत असल्याने तालुक्यातील लोकप्रतिनिधी व शेतकरी संतप्त झाले होते. या निर्णयाविरोधात तसेच हे पाणी केवळ जुन्नरसाठी राखीव ठेवावे यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी ठिय्या आंदोलन केले. तर विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. नागरिकांचा विरोध बघता धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
माणिकडोेह धरणातील पाणी जुन्नर तालुक्यासाठी राखीव ठेवावे या मागणीसाठी तसेच पाणी सोडण्यासाठी विरोध करण्याचा पवित्रा लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी शनिवारी घेतला. आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात रात्री १२ पासून ठिय्या आंदोलन सुरू केले. शिवसेनेचे सुनील मेहेर, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, नगराध्यक्ष शाम पांडे, जुन्नर शहरप्रमुख शिवा खत्री, पाडळीचे सरपंच संतोष केदारी, संतोष घोटणे, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शरद सोनवणे यांनी तालुक्यातून पाणी बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा देतानाच आक्रमक भूमिका घेतली. पाणी सोडण्यात येत असल्याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी त्यांनी चर्चा केली. पाणी येडगाव धरणात सोडण्यात येत असून शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही.