पुणे : पंढरपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे मतदान १७ एप्रिल रोजी होत आहे. राज्यात सध्या घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करून मतदारसंघात येऊ द्यावे, अशा सूचना राज्य शासनाने प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.
१३ एप्रिल २०२१ च्या सरकारी आदेशानुसार १६ एप्रिल २०२१ च्या संध्याकाळी ६ पासून ते १८ एप्रिल २०२१च्या रात्रीच्या १२ वाजेपर्यंत कोणत्याही वाहनाने वैध ओळखपत्रधारक किंवा मतदारयादीत स्वतःचे नाव असल्याचा कोणताही पुरावा घेऊन प्रवास करणाऱ्यास प्रवास वैध समजून परवानगी द्यावी. ब्रेक द चेन शीर्षासह १३ एप्रिल २०२१ या दिवशी काढलेल्या सरकारी आदेशांमध्ये निर्देशित केलेल्या बंधनात राहून असा प्रवास करण्यास संबंधित मतदारांना परवानगी द्यावी, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.