इंदापूर: सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापूर तालुक्यातील तब्बल ६० गावांना शासनाने पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी हा निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे तालुक्यातील साठ गावातील नागरिक शेतकरी प्रचंड संतापले असून त्यांनी बुधवारी निमगाव केतकी, बेलवाडी, हिंगणगाव, इंदापूर शहर व आपापल्या परिसरात शासनाच्या विरोधात आमच्या हक्काचे पाणी पाच टीएमसी आम्हाला मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत अनोखा संताप व्यक्त केला.
इंदापूर तालुक्यातील पाणी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांच्या अध्यक्षतेखाली निमगाव केतकी येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काळया फिती बांधून शेतकऱ्यांनी इंदापूर - बारामती रस्ता रोको करत, झालेल्या निर्णयाचा जाहीर निषेध केला.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच टीएमसी उजनी धरणातून पाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. हा निर्णय रद्द झाला ही गोष्ट अत्यंत शेतकऱ्याच्या मनाला दुःख देणारी आहे. तरी देखील पाणी संघर्ष कृती समिती तालुक्याच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळवण्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची भूमिका पाणी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी यावेळी मांडली.
अन् शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेतले
राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी इंदापूर तालुक्याला उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी दिले जाणार नाही. अशी घोषणा केली या निषेधार्थ एका शेतकऱ्याने कृती समितीच्या बैठकीत अक्षरशा जीवाची तमा न करता, अंगावर डिझेल ओतून घेतले. यावेळी उपस्थितांनी प्रसंग अवधान राखून तात्काळ हालचाल केल्यामुळे अनर्थ टळला.