लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गरवारे महाविद्यालयाशेजारील सेंट्रल मॉलच्या तळघरामध्ये असलेल्या रसायनाच्या वासामुळे नागरिकांना श्वसनाचा, डोळे चुरचुरणे, उग्र वास येण्याचा त्रास सोमवारी दुपारी झाला. अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण माल खाली करून घटनास्थळी पाण्याचा मारा केल्यानंतर हा वास कमी झाला. हे रसायन नेमके काय होते, याची माहिती मिळू शकली नाही. टॉयलेट क्लिनरला पाण्याशी संपर्क आल्यामुळे त्यांची रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे हा त्रास झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांना मॉलच्या प्रशासनाने पाचारण केले होते. त्यांनी या ठिकाणी भेट दिली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण पार्किंगमध्ये पाण्याचा मारा केला होता.
एरंडवणा अग्निशमन केंद्राचे प्रमुख राजेश जगताप यांनी सांगितले की, सेंट्रल मॉलमधील तळघरातील पार्किंगच्या जागेतून पांढरा धूर येत असून त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा डोळे चुरचुरण्याचा त्रास होत असल्याची खबर दुपारी आली होती़ जवानांनी तातडीने विशेष सूट परिधान करुन त्याची पाहणी केली. त्यांनाही डोळे चुरचुरण्याचा त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी रसायनावर पाण्याचा मारा केला. पाण्याबरोबर ते वाहून गेल्याने धूर कमी होऊन त्रास बंद झाला.
एनसीएलच्या तज्ज्ञांनी येथे भेट दिली. मात्र, त्यांना हे रसायन काय होते, त्यांनी काय अहवाल दिला यांची माहिती मिळू शकली नाही.
...
मॉलमधील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पार्किंग आहे. त्या ठिकाणाहून हा रसायनाचा वास येत होता. साफसफाईसाठी आणलेल्या औषधामध्ये वापरले जाणारे हे रसायन असावे. त्यावर पाणी पडल्याने त्यातून बुडबुडे व धूर आला असावा. एनसीएलच्या तज्ज्ञांनी येथे भेट दिल्याची माहिती मिळाली. परंतु, त्यांनी आमच्याकडे याबाबत काही अहवाल दिला नाही.
- मुरळीधर करपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे.