पुणे : कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती खालावल्यास एका रुग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात अथवा घरातून रूग्णालयात नेण्याकरिता, खाजगी रूग्णवाहिका त्यातही आॅक्सिजन असलेली रूग्णवाहिका अवाच्या सवा पैसे मागत आहेत़ यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना सध्या १०८ किंवा महापालिकेच्या रूग्णवाहिकेचा मोठा आधार मिळत असून, त्या पूर्णपणे मोफत असल्याने नागरिकांचा त्यांच्याकडे अधिक कल असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे़
कोरोनाबाधित रूग्णाची आॅक्सिजन पातळी कमी झाल्यावर त्यास लागलीच रुग्णालयात नेण्यासाठी काही खासगी रूग्णवाहिका मनमानी पैसे मागत आहे़ अवघ्या पाचशे सहाशे मीटर अंतरावर असलेल्या रूग्णालयात जाण्यासाठीही तीन ते पाच हजार रूपयांची मागणी शहरात होत आहे़ रूग्णाला रूग्णवाहिकेतून नेल्यानंतर रूग्णवाहिका धुवावी लागते़ दोन पीपीई किटची किंमतच दोन हजार रूपये जाते अशी कारणे या खाजगी रूग्णवाहिका चालकांकडून सांगितली जातात़
दरम्यान या परिस्थितीमध्ये महापालिकेच्या सुमारे १०१ रूग्णवाहिका नागरिकांच्या मदतीला धावल्या आहेत़ सद्यस्थितीला महापालिकेकडे आॅक्सिजनसह ६५ तर आॅक्सिजनविरहित २५ रूग्णवाहिका कार्यरत आहेत़ तसेच महापालिकेने ५५ खाजगी रूग्णवाहिकाही अधिग्रहित म्हणजेच स्वत:च्या ताब्यात घेऊन त्या नागरिकांच्या सेवेत कार्यरत केल्या आहेत़ १०८ क्रमांकावरील राज्य शासनाच्या रूग्णवाहिकेसह सध्या महापालिकेच्या रुग्णवाहिकेसाठी ९६८९९३९३८१ या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्या विनामूल्य उपलब्ध होत आहेत़
------------
चौकट १ -
शासकीय रुग्णवाहिका - १०८ क्रमांक
महापालिकेच्या रूग्णवाहिका आॅक्सिजन असलेल्या - ६५
आॅक्सिजनविरहित साध्या रूग्णवाहिका - २५
शववाहिका - २३
खाजगी रूग्णवाहिका महापालिकेने ताब्यात घेतलेल्या - ५५़
----------------------------------------
चौकट २ -
महापालिकेच्या कोविड-१९ वॉर रूमकडे रूग्णवाहिकेसाठी दररोज साधारणत: ३० ते ३५ दूरध्वनी येतात़ त्या सर्वांना आवश्यकतेनुसार आॅक्सिजन अथवा आॅक्सिजनविरहित लागलीच रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असतो़ शहरात सध्या आॅक्सिजनची गरज असलेल्या रूग्णांची संख्या अधिक असल्याने, महापालिकेने ६५ आॅक्सिजन सुविधा असलेल्या रूग्णवाहिका २४ तास कार्यरत ठेवल्या असून, त्याकरिता ९६८९९३९३८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आरोग्य विभागाने सांगितले आहे़
------------------------------