पुणे: राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कमाल तापमानात वाढ झाल्याने घामाच्या धारा लागल्या आहेत. आज रविवारी (दि.५) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यामध्ये देखील उन्हाचा चटका असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने विदर्भ, मराठवाड्यात आज व उद्या (दि.६) वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यापासून विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड ते पश्चिम बंगालमधील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. पुण्यात रात्री आणि दिवसाही उष्णता जाणवत आहे. किमान तापमानातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यामध्ये नांदेड, लातूर ६ व ७ मे रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. यलो अलर्ट दिला आहे. विदर्भात अकोला, चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येईल, तसेच गारपीट आणि वादळी वारे येईल.