पुणे : शहरातील एसटी स्थानकांच्या आवारात चोरीचे सत्र अद्याप सुरुच असल्याने यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एसटी स्थानकांच्या आवारात प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या परिसरात ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने, रोकड असा २ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज लांबविण्याची घटना घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला मूळची अहमदनगरची असून त्या एका कार्यक्रमाकरिता पुण्यात आल्या होत्या. सकाळी आठच्या सुमारास तिने पुणे ते औरंगाबाद या मार्गावरील एसटी बसमध्ये तिने प्रवेश केला. तिच्याकडील असलेली बॅग तिने एसटी बसमधील लोखंडी जाळ्यावर ठेवली होती. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने बॅग लांबविली. बॅगेत दागिने, रोकड, कपडे होते. बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत. शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकाच्या आवारात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. प्रवाशांकडील ऐवज तसेच लॅपटॉप लांबविणाच्या घटना घडतात. काही घटनांमध्ये चोरीला ऐवज किरकोळ असल्याने प्रवासी तक्रार देण्याचे टाळतात. मध्यंतरी स्वारगेट पोलिसांनी शिवशाही बसमधून मुंबईकडे जाणाºया प्रवाशांच्या बॅगेतील लॅपटॉप लांबविणाºया चोरट्याला अटक केली होती. चोरट्याकडून नऊ लॅपटॉप जप्त करण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात महिला प्रवाशाच्या पिशवीतील सव्वा लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला रायगड जिल्ह््यातील रोहा गावातील रहिवासी आहे. दिवे आगार येथे जाणाºया बसमध्ये ती प्रवेश करत होती. त्या वेळी बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. चोरट्याने गर्दीत महिलेच्या पिशवीतील १ लाख २५ हजारांचे दागिने लांबविले. महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तिने याबाबत तक्रार दिली. पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत.
एसटी स्थानक आवारातील चोऱ्यांच्या घटनांनी नागरिक बेजार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 10:04 PM
शहरातील एसटी स्थानकांच्या आवारात चोरीचे सत्र अद्याप सुरुच
ठळक मुद्देज्येष्ठ महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने, रोकड असा २ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज लुटला