पुणे : नागरिकांनो सावधान! चोरट्यांकडून बंद सदनिका हेरून घरफोड्या करण्याचे प्रमाण वाढते आहे. गेल्या दोन दिवसात शहरात घरफोडीच्या ४ घटना घडल्या आहेत.
शिवाजीनगर, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता या परिसरात या घटना घडल्या. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर गावठाण परिसरातील आर्यवर्त को-ऑपरेटीव्ह सोसायटीत राहणारे सागर दुर्लभजी परमार (वय ३५) यांच्या बंद फ्लॅटमध्ये घरफोडी झाली. फिर्यादी बुधवारी दुपारी कामाच्या निमित्ताने फ्लॅट बंद करून गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रामदास मुंढे तपास करीत आहेत.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिल्वर ओक सोसायटीतील दोन फ्लॅट अज्ञातांनी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तात्रय कदम (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास फ्लॅट बंद करून बाहेरगावी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅट कोयंडा तोडून कपाटातील ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. इमारत क्रमांक दोन मधील ४०२ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये घरफोडी झाली. चोरीचा तपशील मिळालेला नाही. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत आहेत.
हिंगणे-खुर्द परिसरामधील आनंदविहार कॉलनीतील एका घरात बाल्कनीद्वारे प्रवेश करून १ लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात करमवीर शर्मा (वय ४२) यांनी फिर्याद दिली. चोरट्यांनी बाल्कनीतील उघड्या राहिलेल्या स्लायडिंगमधून आत प्रवेश केला. त्यानंतर लाकडी कपाटातील एक लाख रुपयांची रोकड व ६० हजार रुपयांचे दागिने असा ऐवज चोरला.
--------------------------------