लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस ठाण्यातील बिट मार्शल हे आपल्या भागात गस्त घालत आहेत, घालत असतील तर ते कधी, केव्हा, कोणत्यावेळी घालतात? यावर आता नागरिक वॉच ठेवू शकणार आहे. त्याचबरोबर एखादा भाग गस्तीपासून वंचित राहत असेल व तेथे पोलिसांनी गस्त असणे आवश्यक वाटत असेल, तर तशी सूचना ते पोलिसांना देऊ शकणार आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून ‘माय सेफ पुणे’ हे अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या साह्याने पोलीस ठाण्याकडील बिट मार्शल हे हद्दीमध्ये गस्त घालत असताना किंवा कोणत्याही घडलेल्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी सेल्फी फोटो काढून ‘माय सेफ पुणे’ अॅपमध्ये अपलोड केल्यास घटनेच्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश व वेळ नोंद होते. अॅपवरून पोलीस नियंत्रण कक्षाला बिट मार्शल कोणत्या भागामध्ये गस्तीवर आहे, याची माहिती मिळते. बिट मार्शलने कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी भेट दिली याची सर्व माहिती अॅपमध्ये उपलब्ध राहते. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेले दीड महिना त्याचे प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येत होती. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते या अॅपचे लोकार्पण करण्यात आले.
या अॅपद्वारे रेकॉर्ड होत असलेल्या गस्तीवरील कार्याची तपासणी पोलीस आयुक्त व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज केली.
याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, पोलीस आपल्या भागात गस्त घालत आहे की नाही, याची नागरिकांना माहिती मिळाली पाहिजे. पोलिसांचा कारभार अधिक पारदर्शी आणि लोकाभिमुख करून त्यात लोकांचा सहभाग वाढविण्याचा उद्देश आहे. या अॅपद्वारे नागरिक आपल्या भागात पोलीस कधी गस्त घालतात. ते कधी असतात, याची माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर या अॅपवर लवकरच आम्ही एक लिंक देणार आहोत. त्याद्वारे एखादा भाग पोलिसांच्या गस्तीमधून कव्हर होत नसेल व नागरिकांना आवश्यकता वाटत असेल तर नागरिक त्या भागाविषयी सूचना नागरिक येथे करू शकतील.
अनेकांना आपल्याला भागात पोलीस फिरकत नाही, असा समज असतो. पण ते बरेचदा खरे नसते. नागरिकांनाही आपल्याला भागात पोलिसांची उपस्थिती असते. ते कधी गस्तीवर असतात, याची माहिती अॅपच्या माध्यमातून नागरिकांना मिळेल व नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढण्यास मदत होईल, असे पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले.
.......
नागरिकांप्रति उत्तरदायित्व असावे. पोलिसांचा कारभार अधिकाधिक पारदर्शी असावा, आपल्या सुरक्षेबाबत पोलीस काय करीत आहेत, याची माहिती नागरिकांना मिळावी व त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास पोलीस बांधिल आहेत, या हेतूने हे अॅप विकसित करीत आहोत.
- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर