पुणे: कामगार पुतळा येथे होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीतमुळे, येथील झोपडपट्टीधारक नाराज असून त्यांचे स्थलांतर करताना त्यांचे म्हणणे ऐकूनच न घेता सरकार दमदाटीने स्थलांतर करत असून, या स्थलांतराला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. तो दर्शवण्यासाठी काल दिवाळीच्या पहिल्या दिवशी रस्त्यावरच पहिला दिवा पेटवत प्रकल्पग्रस्तांनी सरकारचा निषेध करत दिवाळी साजरी केली.
कामगार पुतळा वसाहत मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होत असून, येथील झोपडी धारकाचे स्थलांतराचे काम गेले सहा महिन्यांपासून चालू आहे, काही झोपडीधारक सध्याच्या जागेवरच किंवा शिवाजी नगर भागांमध्ये उपलब्ध असलेल्या सरकारी भूखंडावर आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी करत आहेत. परंतु या मागणीकडे सरकार, महामेट्रो हेतुपरस्पर दुर्लक्ष करीत आहेत. पुनर्वसन करताना येथील रहिवासी गेल्या साठ ते सत्तर वर्षे जुने असून त्यांचा उदरनिर्वाहाचे, शिक्षणाचे काय ? असे येथील नागरिक प्रश्न विचारत आहेत. शिवाजीनगर परिसरात अनेक सरकारी पडीक भूखंड असून ते सरकाराने ताब्यात घेत आम्हाला त्याच ठिकाणी राहण्याची घरे द्यावीत अशी आमची मागणी आहे. सध्या याप्रकरणी स्थानिक रहिवासी हे उच्च न्यायालयात गेले आहेत.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कामगार पुतळा वसाहती मधील नागरिकांनी रस्त्यावर दिप प्रज्वलीत करून दिवाळीचा पहिला दिवा लावत सरकारला या दिव्यांच्या माध्यमातून शिक्षण, रोजगार या मागणीचा संदेश दिला आहे. सरकारची दिवाळी सुखात आणि झोपडी धारकांची दिवाळी दु:खात होत असल्याची भावना स्थानिकांनी या वेळी व्यक्त केली. कामगार पुतळा वसाहतीवर होणारी कारवाई व राज्य सरकारचा निषेध आज आम्ही या दिव्यांच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. यावेळी बबन भालके, हमीद शेख ,मयुर घोडे,विकी कांबळे, किशोर कांबळे, आप्पा आखाडे, शिरीष पाटीलस, खुबाई डेंगळे, कविता चव्हाण, हमीदा खान आदी स्थानिक रहिवाश्यांनी रस्त्यावर दिवे पेटवत सरकारचा निषेध व्यक्त केला.