पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील 22 भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय शहरातला मध्यवस्तीचा भाग, प्रमुख पेठा तसेच शहराच्या सीमेवर असणाऱ्या उपनगरातील बराचसा भाग सील करण्यात आला आहे. विशेषत: कोरोना संक्रमित भागातील नागरिकांकडून पोलिसांना सहकार्य मिळत नसल्याचे दिसून आले आहे. विनाकारण बाहेर पडणे, सोशल डिस्टन्स न ठेवणे यामुळे कायद्याचे उल्लंघन होत आहे. कसबा पेठेत अनेक नागरिक दुपारच्या वेळी गप्पा मारण्यासाठी घराबाहेर येऊन बसत असल्याचे दिसून आले आहे. अनेकजण गल्लीबोळात उभ्या असणाऱ्या रिक्षांमध्ये बसून टवाळकी करत आहेत. कुठलेही निमित्त पुढे करून ते घराबाहेर पडत आहेत. रात्रीच्या वेळी काहीजण मोबाईल वर बोलताना दिसून येत असून त्यांना पोलिसांनी सूचना देऊनही त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. दिवसेंदिवस कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. तरीही नागरिक याची धास्ती घेत नाहीत. म्हणूनच पोलिसांनी त्या भागातील फेऱ्या वाढवल्या आहेत. दाट वस्ती असल्याने सील भागातील गल्लीबोळही बंद करण्यात आले आहेत. तसेच कामाव्यतिरिक बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला घेण्यासाठी १० ते १२ यावेळेत नागरिक बाहेर पडतात. पोलिसांच्या भीतीने सध्या तरी सोशल डिस्टनसिंगचे पालन केले जात आहे. नागरिकांनी घराबाहेर येऊ नये. असे आवाहन पोलीस सातत्याने करत आहेत. शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक भाग सील करण्यात आले. परंतु त्यातील बहुतांशी भाग दाटीवाटीचे असल्याने नागरिक काम नसतानाही घराबाहेर येत आहेत. पोलिसांना सहकार्य न करता नागरिकांची मनमानी होत असल्याचे दिसून आले आहे. येरवडा, धानोरी या भागात नियमांचे पालन केले जात आहे. अनेक ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलाय आहे. त्यामुळे नागरिक गाडी घेऊन फिरू शकत नाहीत. दिवसातून तीन, चार पोलिसांच्या फेऱ्या होत असतात. किराणा मालच्या दुकानातून सोशल डिस्टनसिंगचे पालन होत आहे. परंतु भाजीपाला घेताना गर्दी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. लक्ष्मीनगर येथील झोपडपट्टी भागात कफ्युर्ला कोणीही मनावर घेत नसल्याचे चित्र दिसून आले आहे. याठिकाणी नागरिक विनाकारण घराबाहेर येतात. पोलीस आले की या लोकांमध्ये पळापळ होते. या भागात पोलिसांनी गस्त वाढवणे गरजेचे आहे. असे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. पर्वती दर्शन भागात दिवसाला एक तरी कोरोना रुग्ण आढळून येत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा दाटीवाटीचा भाग असल्याने घराघरात जाऊन नागरिकांची तपासणी करावी. अशी मागणी या भागातील लोकांनी केली आहे. सध्या तरी सकाळी १० ते १२ ही वेळ सोडून नागरिक बाहेर येत नाहीत.
* सिंहगड रस्ता आनंद नगर भागात नियमांचे पालन केले जात आहे. या भागातही अनेक ठिकाणी बांबू आणि लोखंडी रॉड बांधून प्रवेश बंद करण्यात आले आहेत. नागरिकही विनाकारण रस्त्यावर येत नाहीत. पोलिसांच्या सुचनेचेही पालन करत असतात.
* इतक्या दिवस नागरिकांनी खुप मनापासून सहकार्य पोलिसना केले आहे. आणखी थोडे दिवस त्यांनी काळजी घ्यावी. महिन्यापासून घरात बसून असल्याने थोडा वैताग येणे साहजिक आहे. मात्र हा त्रास सहन करून त्याकडे दुर्लक्ष केल्यास कोरोनाला हरवणे शक्य आहे. वेळ सर्वांना सहकार्याची आहे हे लक्षात ठेवा. विनाकारण कुणी बेशिस्तपणा करून सगळ्या समाजाला वेठीस धरणार असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. - एक पोलीस कर्मचारी (नाना पेठ).