चाकण : औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या सुटल्यानंतर नित्याच्याच होणाऱ्या वाहतूककोंडीने नागरिक अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. बुधवारी पुणे-नाशिक आणि तळेगाव-चाकण या मार्गावर अगदी दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सणासुदीला लवकर घरी पोहोचण्याच्या घाईत बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीत भर पडत होती.
पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौक व तळेगाव चौक, पुढे आळंदी फाटा आणि स्पायसर चौक ओलांडून पुढे जाण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. आळंदी फाटा ते थेट कुरुळीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागण्याने पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. चाकणमधील तळेगाव चौक आणि आंबेठाण चौकात सिग्नलपासून लांबपर्यंत महामार्ग आणि सेवारस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
तळेगाव ते चाकण या मार्गावर ही कंपन्या सुटल्यावर खराबवाडी,रानुबाईमळापर्यंत प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. बेदरकार व नियमबाह्य वाहने चालविणाऱ्र्या वाहनचालकांमुळे रोजच अधूनमधून होणारी वाहतूककोंडी आज संध्याकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या प्रचंड लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या घरगुती गणपती सणासाठी प्रत्येक जण लवकर घरी पोहोचण्यासाठी प्रत्येक वाहनचालक स्वतःचे वाहन पुढे दामटण्याच्या ईर्ष्येने प्रचंड वाहतूककोंडी होत निर्माण झाली ती वाहतूककोंडी हळूहळू वाढत जावून वाहनांच्या लांबच लांब रांगा याचा सामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
बेदरकार आणि बेशिस्त वाहनचालक, अरुंद रस्ते, चुकीचे उड्डाणपूल, चौकातील अतिक्रमण तसेच अवैध प्रवासी वाहतूक यामुळे सतत वाहतूककोंडी होत आहे. चाकणच्या मुख्य चौकात मोठ्या संख्येने अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे.याकडे वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मात्र, नियमांत चालणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाइन दंड पावत्या देण्यात येत आहेत.
राम गोरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चाकण.
--------------------------------------------------------
१६ चाकण
पुणे-नाशिक महामार्गावर झालेली वाहतूककोंडी.