हडपसर : पुण्यात पाणीकपातीमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. नियमित पाणी न मिळणाऱ्याला टँकरने पाणीपुरवठा केला जातो. अनेक ठिकाणचे नागरिक पाण्याच्या टँकरवरच अवलंबून आहेत. त्यामुळे या टँकरकडे नागरिक डोळे लावून बसतात. रामटेकडी येथील पंपिंग हाऊसवर मात्र पाण्याचा अपव्यय होताना दिसतो.रामटेकडी येथील पंपिंंग हाऊसमध्ये दररोज टँकर पाण्याने भरतात. येथील पाणी सोडणारे व्हॉल्व्ह लिकेज आहेत. ते पूर्ण बंद करण्यासाठी फिरवले तरी ते पूर्ण बंद होत नाहीत, तर ते सोडले तर व्हॉल्व्हमधून पाणी वाया जाते. टँकरचे पाणी सोडण्याचे व्हॉल्व्ह पण असेच आहेत. त्यातून पण पाणी वाया जाते. व्हॉल्व्ह चालू ठेवून टँकर बदलण्यात येतो. टँकरच्या खाली अंघोळही करतात. पाणी रस्त्याने वाहत ड्रेनेजला जाते.नागरिक पाण्यासाठी वणवण करतात. मात्र येथे पाणी रस्त्यावरून वाहत जात आहे. टँकरच्या पंपिंंग स्टेशनवर होणाºया पाणीगळतीकडे पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. व्हॉल्व्हदुरुस्ती करून येथे शिस्त लावणे महत्त्वाचे आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर अंघोळ व वाहने धुण्यासाठी करण्यात येऊ नये. यासाठी कडक नियम घालून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.टँकरशिवाय राहिला नाही पर्यायफुरसुंगी व उरुळीदेवाची परिसरासह हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई झालेली आहे. कचरा डेपोमुळे फुरसुंगी व उरुळीदेवाची येथील पाणीसाठा दूषित झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना टँकरशिवाय दुसरा पर्याय नाही. टँकर कधी येईल, याची खात्री नसते. भेकराईनगर, ढमाळवाडी परिसरात आठवड्यातून एकदा टँकर येतो.सोसायटी व गल्लीमध्ये ठेवण्यात आलेल्या टाक्यांमधून टँकरने पाणी टाकण्यात येते. तेथूनच नागरिकांना पाणी भरावे लागते. कधी कधी पाणी न मिळाल्याने येथील नागरिकांना हडपसर गाडीतळावर जावे लागत आहे. मात्र हडपसरच्या नागरिकांनाच पाणी येत नसल्याने भेकराईनगर, गंगानगर, ढमाळवाडी परिसरातील नागरिकांना कधी मिळणार, हा प्रश्न आहे.
टँकरकडे नागरिकांचे डोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 3:37 AM