या पार्श्वभूमीवर आळंदी विकास युवा मंच व मनसेच्या वतीने तत्काळ उपाययोजना कार्यान्वित करण्याची मागणी नगरपरिषदेकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. दरम्यान, आळंदी शहरात सातत्याने औषध फवारणी केली जात असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
आळंदीत विविध ठिकाणच्या गल्लीबोळात अस्वच्छता पसरली आहे. गावठाण आणि मंदिर परिसरात नदीकाठच्या अस्वच्छतेमुळे मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याने तसेच रस्त्यालगत साठलेल्या कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी रस्त्यावरून चालताना नाकाला रुमाल लावून स्थानिक नागरिकांना मार्गस्थ व्हावे लागत आहे. भागीरथी नालावरील स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत. पद्मावती रस्ता, घुंडरे आळी, केळगाव रोड परिसरात साफसफाई नसल्याने त्या परिसरात मच्छरांची पैदास अधिक प्रमाणात होत असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.
मच्छरांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरिया, ताप येणे असे विविध आजार होऊ लागले आहेत. आधीच कोरोनाने हैराण असलेल्या आळंदीकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरात दिवसाआड का होईना औषध फवारणी व धुरळणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
आळंदी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली शहराचा कंटेनर सर्वे करण्यात आला आहे. शहरात साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्यासाठी औषध टाकण्यात आले आहे. शहरातील प्रभागनिहाय औषध फवारणी व धुरळणीचे काम सुरू आहे. यापुढे दररोज तीन प्रभागांत फवारणीचे काम करण्यात येईल. डेंग्यू रोगाबाबत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात असून नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे.
-अंकुश जाधव, मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद