राजगुरुनगर : खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान धरणातीलपाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. धरण भरल्याने शेतकरी व दोन्ही तालुक्यांतील नागरिक आनंदित आहेत. श्री क्षेत्र भीमाशंकर येथून उगम पावणाऱ्या भीमा नदीवर ८.५३ टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरण म्हणजे खऱ्या अर्थाने दोन्ही तालुक्यांसाठी वरदान आहे.
आज सकाळीच चासकमान धरण १०० टक्के भरल्यामुळे सांडव्यावरून ९२५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तसेच विद्युत गृहातून ८५० क्यूसेक्स निसर्ग सुरू असून त्यापैकी ५५० क्युसेक्स कालव्यातून चालू आहे. व ३०० क्युसेक्स कि. मी. ०/८१० मधील अतिवाहक मधून नदीत सोडण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक अभियंता प्रेमनाथ शिंदे यांनी दिली.
धरणातील उपयुक्त पाणीसाठा २१४.१५ द.ल. घ.मी. इतका आहे. पाण्याचा विसर्ग भिमा नदी पात्रात सोडण्यात आल्यामुळे भिमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना सर्तकेचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे. नदी काठावर असणारे विद्युतपंप, शेतीचे अवजारे व इतर साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची खबरदारी घ्यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, भिमा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.