पंढरीनाथ नामुगडे
कदमवाकवस्ती : लोणी स्टेशन येथील परिसरात असलेल्या कोरोना तपासणी केंद्रात दररोज केवळ ५० जणांचीच कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे ५० जणांमध्ये नंबर लावण्यासाठी येथील नागरिकांना पहाटे चार वाजल्यापासून रांगेत उभे रहावे लागत आहे. सोमवारी तपासणीसाठी आलेले नागरिक आणि तपासणी कर्मचारी यांच्यात वाद झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता.
तपासणी केंद्रात दिवसभरात केवळ ५० जणांचीच तपासणी केली जाते. ५० जण पूर्ण झाल्यानंतर हे तपासणी केंद्र बंद केले जाते.
सोमवारी नेहमीप्रमाणे नागरिकांनी पहाटेपासून तपासणी केंद्राबाहेर रांग लावली होती.
हे केंद्र सकाळी आठ वाजता उघडल्यावर नागरिकांची तपासणी सुरू झाली. रांगेत असलेल्या नागरिकांना तपासणीसाठी नंबर आल्यावर तपासणी कर्मचाऱ्यांनी त्यांना लोणी काळभोर आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन येण्यास सांगितले. परंतु याबाबत पूर्वसूचना न दिल्याने नागरिक संतप्त झाले. नागरिक आणि तपासणी अधिकार्यांमध्ये बाचाबाची झाल्याने केंद्रावर गोंधळ उडाला.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, मांजरी, महादेवनगर या परिसरातून नागरिक या केंद्रात तपासणीसाठी येत आहेत. दररोज केवळ ५० जणांची तपासणी दररोज होत असल्याने उर्वरित नागरिकांना घरी जावे लागत आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतरही चाचणी वेळेत होत नाही त्यामुळे उपचार घेण्यास विलंब होत आहे. त्यामुळे काही रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे. चाचणीसाठी रांगेत थांबल्यानंतर आंतरनियमाचे पालन होत नसल्याने बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. चाचण्या वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कोट
तपासणी केंद्रात सकाळी पन्नास नागरिकांच्या कोरोना तपासण्या रोज होतात. तसेच या चाचणीसाठी कुठल्याही चिट्ठीची आवश्यकता नाही. नागरिकांनी या तपासणी केंद्रात सकाळी येऊन तपासणी करून घ्यावी. आंतरनियमाचे पालन करून रांगा लावाव्यात.
- डॉ. डी. जे. जाधव. आरोग्य अधिकारी, लोणी काळभोर आरोग्य केंद्र.
कोट
कोरोना तपासणी केंद्रात सकाळी आठ वाजताच ५० नावे निश्चित केली जातात. यातील काहीजण सकाळी रांगेत नसूनही अचानक येऊन तपासणी करून घेत आहेत. आरोग्य विभागाने याबाबत ठोस कारवाई करावी.
- महेश भंडारी, नागरिक,कदमवाकवस्ती.