आळंदी : आळंदीमध्ये तुम्ही कधी आलात, तर आळंदी पहिल्यासारखी राहिली नाही. पहिलं महाराज लोकांना चोरासारखं राहाव लागत होतं. मात्र आता आम्ही आळंदीत बाप आहे सगळ्यांचे. ''आळंदीत काही मॅटर घडू द्या, आणि तो मला कळू द्या, जर तुमचं मॅटर सोडवला नाही तर मी कीर्तन करायचे सोडून देईल''. माझ्या पायावर जाऊ नका. मी बिघडलो की खूप हाणतोय. पोलीस स्टेशनचं मॅटर असू द्या, दवाखान्याचं असू द्या, काही असू द्या. मी ते दहा मिनिटात रफा - दफा करतो असे वक्तव्य ह.भ.प. लक्ष्मण महाराज पाटील यांनी एका किर्तनात बोलताना केले.
मात्र या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पहायला मिळाल्यानंतर आळंदीकर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत या वक्तव्याचा तसेच लक्ष्मण पाटील यांचा जाहीर निषेध नोंदवला आहे. दरम्यान पाटील यांनी घडल्या प्रकाराबद्दल व्हिडीओच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे. श्री भैरवनाथ उत्सव मंडळ व आळंदीकर ग्रामस्थांनी संबंधीत महाराजावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आळंदी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. वारकरी संप्रदायात ही भाषा महाराज मंडळींना शोभते का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. लक्ष्मण महाराज पाटील यांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर जाहीर माफी मागावी अशी मागणी समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी आळंदीतील सर्वपक्षीय प्रतिनिधी, आजी - माजी लोकप्रतिनिधी, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.