मागील अनेक महिन्यांपासून खेडच्या पूर्व भागातील अनेक गावांमधील बागायती पट्ट्यात बिबट्याचा वावर असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. साबळेवाडी, कोयाळी भानोबाची, मरकळ, मोहितेवाडी, बंगलावस्ती, दौंडकरवाडी, रामनगर, साबळेवस्ती, चिंचोशी आदी ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे दर्शनही झाले आहे.
रामनगर परिसरातील पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करून पाळीव कुत्री फस्त केली आहेत. मागील दोन दिवसांपासून दिवसाढवळ्या हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात वावरताना दिसत आहे. परिणामी बिबट्याच्या दहशतीने स्थानिकांमध्ये भीती भरली असून वनविभागाने त्यास जेरबंद करण्यासाठी उपाययोजना कार्यान्वित करण्याची मागणी माजी चेअरमन सतीश गुजर यांनी केली आहे.
चौकट :
सध्या रब्बी हंगामातील शेतकामे सुरू आहेत. मात्र बिबट्याच्या दहशतीने मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून महिलावर्ग शेतात कामाला जायला नकार देत आहेत.