हडपसर : हडपसर परिसरातील वाहतूककोंडी हा नित्याचा आणि गंभीर प्रश्न बनला आहे. मात्र, त्यावर वेगवेगळ्या उपाययोजना करून अभ्यासात्मक बदल करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून, रस्त्यावरील वाहतुकीत बदल जाणवत आहे.सासवड रस्त्यावर तुकाईदर्शन चौकात होणारी वाहतूककोंडी तेथे लावण्यात आलेल्या रस्ता दुभाजकांमुळे कमी झाली आहे. कुठूनही शिरणाऱ्या वाहनांना यामुळे चाप बसला आहे. गांधी चौकात शौचालयाच्या बाजूने वाहनांसाठी रस्ता केल्याने पूर्वी गाडीतळापर्यंत जाऊन परत फिरावे लागत होते. त्यामुळे वेळ वाया जात होता. सध्या केलेल्या उपाययोजनांमुळे वेळ वाचत असल्याने दुचाकीस्वारांसह कारचालकांनी समाधान व्यक्त केले.मंत्री मार्केटसमोरील उड्डाणपुलाखालून येणारी वाहने बंद केल्याने भाजीमंडईकडे जाताना होणारी वाहतूककोंडी आता होत नाही. गांधी चौकातील वेशीमध्ये दुभाजक लावल्याने येथे चारचाकी वाहने जात नसल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे. रविदर्शनसमोर खासगी बस प्रवाशांना घेण्यासाठी थांबत असल्याने वाहतूककोंडी होत असे. मात्र, आता डीपी रोडला त्या बसची व्यवस्था केल्याने सध्या येथील गर्दी कमी झाली आहे. हडपसरमध्ये उड्डाणपूल झाला तरी वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचाच राहिला आहे. मात्र, काही वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जे बदल केले आहेत, त्या बदलाने वाहतूककोंडी कमी होण्यात यश येत आहे. (वार्ताहर)
कोंडीतून नागरिकांची सुटका
By admin | Published: April 24, 2017 5:01 AM