लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “तुरुंगात असणारे कैदी हे मोठे मनुष्यबळ आहे. काहींच्या आयुष्याची गाडी भरकटते आणि ते येथे येतात. यातील काहींची गाडी रुळावर कशी आणता येईल, दिशा भरकटलेली ही माणसे योग्य मार्गाला कशी लागतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. येरवडा कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्कार केंद्र व्हावे,” अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज्यात ‘कारागृह पर्यटन’ या अभिनव संकल्पनेचा आरंभ येरवडा कारागृहातून करण्यात आला. त्या वेळी दृकश्राव्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. पुण्यातून उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, आमदार सुनील टिंगरे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई आदी उपस्थित होते. गृहमंत्री अनिल देशमुख हे दृकदृश्य प्रणालीद्वारे गोंदियातून या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अजित पवार यांनी सांगितले की, या कारागृहात स्वातंत्र्य संग्रामातील थोर नेते महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू बंदिस्त होते. हे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता ‘कारागृह पर्यटन’ ही वेगळी संकल्पना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, येरवडा कारागृहातील स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास जनतेला समजण्यासाठी पहिल्या टप्प्यात ‘कारागृह पर्यटन’ सुरू केले आहे.
अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी प्रास्ताविक केले. कारागृह अधीक्षक यू. टी. पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, तहसीलदार तृप्ती पाटील तसेच कारागृहाचे अधिकारी-कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
चौकट
मुख्यमंत्री यायचे ‘येरवड्यात’
“येरवड्यात शिवसेनाप्रमुखांना भेटण्यासाठी येत होतो. त्या काळी ते पत्र पाठवत असत, पण शिवसेनाप्रमुखांनी पत्रात आम्हाला कधी निराश करणारी भाषा वापरली नाही. निराश होऊ दिले नाही. ‘गजाआडचे दिवस’ या पुस्तकात प्रत्येक दिवसात काय काय झाले याची तपशीलवार माहिती शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे.”
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री.