लोणी काळभोर : सध्या देशात तसेच राज्यात कोरोना लसीकरण सुरू आहे. याला अपवाद पुणे जिल्हा आणि तालुकेही नाहीत. शासनाने आरोग्य विभागाला नियमित लसीकरण सुरू ठेवावे. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह कुंजीरवाडी, व उरुळी कांचनसारख्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केेंद्रात लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना नाईलाजाने गुरुवार व शुक्रवारी घरी परतावे लागले आहे. सुरुवातीला या लसीकरणाला लोकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु आरोग्य विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांमधील याबाबत असलेली भीती नष्ट झाल्याने त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. परंतु गेले दोन दिवसांपासून लस उपलब्ध होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. तालुक्यात कुठेच लस उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे साहजिकच लस घेण्यासाठी दूरवरून येणाऱ्या लोकांना पुन्हा आपल्या घरचा रस्ता धरावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कालपर्यंत तालुक्यातील बहुतांश लसीकरण केंद्रांवरची लस संपली असल्याने तसेच अद्याप जिल्हा पातळीवरून लस उपलब्ध झाली नसल्याने नाईलाजाने लसीकरण थांबवावे लागले आहे.
पुर्व हवेेेलीत सध्या कोरोना रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. आकडेवारीवरून ही गावे हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना लवकरात लवकर लस उपलब्ध होऊन त्याचा लाभ मिळावा, अशी आग्रही मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून ४५ वर्षांवरील सहव्याधी तसेच अन्य व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. या ठिकाणी फ्रंटलाइन वर्कर तसेच आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण करण्यात आले आहे. राज्य सरकारने ४५ वर्षे वयोगटावरील सर्वांनाच लसीकरण करण्याचा सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. परंतु आठच दिवसात लस संपल्याने नागरिकांत तीव्र नाराजी दिसून येत असून लसीकरणाला ब्रेक लागल्याने नाईलाजाने त्यांना घरी परतावे लागत आहे.
आज अखेर लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ हजार १६५ जणांना, उरूळी कांचन प्राथमिक आरोग्य केेंद्रात ३ हजार ८३५ जणांना तर कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केेंद्रात ३ हजार ५७० जणांना लस देण्यात आली आहे. परंतु लोकसंख्येचा विचार करता पूर्व हवेलीत मोठ्या प्रमाणात लसीची गरज आहे.
--
कोट -१
आतापर्यंत हवेली तालुक्यात ६४ हजार १२३ जणांना लस देण्यात आली आहे. सद्यस्थितीत शासनाकडून लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण थांबले आहे. ही बाब सत्य असली तरी येत्या दोन दिवसांत व्हॅक्सिन उपलब्ध होणार आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याने लस उपलब्ध होताच लसीकरण कार्यक्रमाला पुन्हा सुरूवात करण्यात येईल.
डॉ. सचिन खरात
-तालुका आरोग्य अधिकारी
--
फोटो - शुक्रवारी सकाळी लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केेंद्रात लस घेण्यासाठी झालेली गर्दी.