एक तर लसींचा तुटवडा असल्याने शासनाकडून मोजक्याच लसी पुरविल्या जात असल्याने लसीकरण केंद्रावर रांगा लावून संपर्कात येत असलेले नागरिक पॉझिटिव्ह होत असल्याचा प्रकार चिंताजनक बनत चालला आहे.
संपूर्ण देशात जानेवारी २०२१ च्या शेवटला कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम फ्रन्टलाईन वर्कर यांना कोविशिल्ड, कोव्हेक्सीन लसीचे डोस देण्यात आले. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याकरिता शासनाकडून परवानगी देण्यात आली. तर आता १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाबाबतचा निर्णय शासनाकडे राखीव आहे. शहरी भागामध्ये काही प्रमाणात तरी लसीकरणाविषयी जागृती होती, मात्र ग्रामीण भागामध्ये लसीकरण यापुर्वी थंडबस्त्यात होते.
मात्र, सध्या लसीकरण चालू झाल्यापासून कोरोनाबाधितांचा आकड्यांनी प्रचंड वेग धारण केला आहे.
त्यामुळे नागरिका॑मध्ये चिंताजनक वातावरण आहे. शासनाच्या निर्देशानुसार नागरिक लसीकरणासाठी जागरूक झालेले आहेत. मात्र जोपर्यंत मुबलक प्रमाणात लस शासनाकडून उपलब्ध केली जात नाहीत, तोपर्यंत केवळ रांगा लागत राहतील. आणि त्यातून कोरोनाची बाधा प्रचंड प्रमाणात वाढत राहील.
शासनाने १ मे पासून १८ वयोगटावरील सर्वांना लसीकरण सांगितल्यापासून तरुणांकडून लसीबाबत शासकीय रुग्णालयात वेळोवेळी विचारणा होत असल्याने तरुण लसीकरण केंद्राकडे लसीच्या नावाखाली विनाकारण फेऱ्या मारत आहेत. तसेच लसीच्या तुटवड्यामुळेही नागरिकांना कोरोनाला बळी पडावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. मोजक्याच लसींचा पुरवठा होत असल्याने, आरोग्य केंद्रावर लसीसाठी नागरिकांची गर्दी उसळत आहे. त्यामुळे कोरोनाची बाधा होण्याचेही प्रमाण वाढले आहे.
नागरिकांनी कोणती लस केव्हा घ्यावी याची नागरिकांनाच माहिती नाही
कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सध्यातरी केवळ, कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी नागरिकांना देण्यात येत आहेत. काहींनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. ४५ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यावा लागत आहे. मात्र तोच डोस दुसऱ्यावेळी उपलब्ध नसल्याने, नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. नेमकी कोणती लस केव्हा आणि किती दिवसांनंतर घ्यायची याची अनेक नागरिकांना माहिती नसल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात दिसून येत आहे.
इंदापूर तालुक्यात एकच लसीकरण केंद्र
इंदापूर तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लस घेण्यासाठी केवळ ७०० डोस उपलब्ध झाले आहेत. तालुक्यात फक्त पळसदेव या ठिकाणी लसीकरण चालू आहे. दिवसाला १०० नागरिकांना सात दिवस लसीकरण करणार आहोत, अशी माहिती इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली. तर इंदापूर तालुका एवढ्या भयंकर कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील गावडे नॉट रिचेबल आहेत. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर सातत्याने संपर्क साधला, परंतु भ्रमणध्वनी बंद लागला. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरुन योग्य समज देण्याची गरज निर्माण झाली आहे.