भिवरी येथे अँटिजेन चाचणी शिबिर
गराडे : सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. जनमाणूस भयभीत झाले असून परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी संयमाने वागून लाॅकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. शासकीय आरोग्य तपासणी व औषधे मोफत व दर्जेदार आहेत. त्या आरोग्य सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती, विद्यमान सदस्य दत्तात्रय काळे यांनी केले.
भिवरी (ता. पुरंदर) येथे पुरंदर पंचायत समिती व भिवरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विभागाच्या साहाय्याने अँटिजेन चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्यमान सदस्य दत्तात्रय काळे व सरपंच संजय कटके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक गुलाब घिसरे, उपसरपंच प्रणोती कटके, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कटके, मारुती कटके, हरिदास गायकवाड, शेखर पिसे, संगीता गोरड, कौशल्या दळवी, साधना ताम्हाणे, यशोदा कटके, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे, तलाठी गणपत खोत, कानिफनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते.
अँटिजेन चाचणी शिबिरात दिवसभर १२२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १८ जण चाचणीत बाधित सापडले. त्यांना कोरोनाविषयक सर्व सूचना देऊन औषधे पुरविण्यात आली.
अँटिजेन चाचणी शिबिराच्या यशस्वितेसाठी आरोग्य सहाय्यक सदाशिव अडसूळ, दादा गुरव, आशा कर्मचारी मनीषा लोणकर, शीतल जगताप यांनी सहकार्य केले.
भिवरी परिसरात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हे अँटिजेन चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच आठ दिवस भिवरी परिसरात कडक लाॅकडाऊन करण्यात आल्याचे सरपंच संजय कटके यांनी सांगितले.