लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मागील शनिवार, रविवारच्या लॉकडाऊनपेक्षा या शनिवारी लोकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक दिसत आहे. शनिवार, रविवारी शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. पोलिसांवर कारवाईची वेळ आणू नका, असा इशारा सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.
या शनिवार, रविवारीही विकेंड कफ्यु लागू आहे. असे असताना आज नागरिक अधिक संख्येने बाहेर पडता दिसत आहे. ही चिंताजनक बाब असल्याचे निरीक्षण डॉ. शिसवे यांनी नोंदविले आहे.
प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार शहरात शनिवारी आणि रविवारी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला विक्रीची दुकाने बंद राहणार आहे. दूध विक्रीस सकाळी अकरा वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. औषध विक्री, प्रयोगशाळा, रूग्णालयांना निबंर्धातून वगळण्यात आले आहे. गेल्या शनिवारी आणि रविवारी नागरिकांनी टाळेबंदीस उस्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्व व्यवहार बंद आहेत. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. कारवाई करणे हे पोलिसांचे धोरण नाही. मात्र, करोनाच्या संसगार्ला आळा घालण्यासाठी संपर्क टाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी कारवाईची वेळ आणू नये, असे डॉ. शिसवे यांनी सांगितले.
यापूर्वी शहरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीस नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला होता. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. नाकाबंदीत ओळखपत्राची मागणी करण्यात येईल. ओळखपत्र किंवा योग्य कारण नसल्यास पोलिसांकडून वाहन जप्तीची कारवाई, दंडात्मक कारवाई तसेच खटले दाखल करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.