पुणे : गेल्या अनेक निवडणुकांमध्ये ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात आल्यामुळे निःपक्ष मतदानासाठी यापुढे ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी पुण्यात रविवारी स्वाक्षरी माेहिमेचे आयाेजन करण्यात आले हाेते. राजीव मिशन, राजीव गांधी स्मारक समिती आदींच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी हजाराे नागरिकांनी या माेहिमेला प्रतिसाद देत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी स्वाक्षऱ्या केल्या.
टिळक चौकातील न. चि. केळकर व सेनापती बापट पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोहिमेला सुरवात झाली. काँग्रेसचे नेते आबा बागुल, सदानंद शेट्टी, सोनाली मारणे, राष्ट्रवादीचे रवींद्र अण्णा माळवदकर, प्रवीण करपे, गणेश नलावडे, सूर्यकांत मारणे, भाऊ शेडगे, गौरव बोराडे, संजय उकिरडे, विनायक चाचर, संदीप मोरे, सुरेश कांबळे, अनंता गांजवे, शारदा वीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोपाळ तिवारी म्हणाले, "जगातील अनेक प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएमला फाटा देत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास प्राधान्य दिले आहे. भारतीय लोकशाही सर्वात मोठी असून, त्याचे पावित्र्य जपावे व मतदारांच्या मताचा आदर व्हावा, यासाठी साशंक ईव्हीएमचा वापर करू नये. भारतातही बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात. निवडणूक आयोगाच्या माजी आयुक्तांनीही ईव्हीएमला क्लिनचिट दिलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक हिताचा विचार करणारे सरकार स्थापित होण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्याव्यात."
रवींद्र माळवदकर म्हणाले, "राजकीय भूमिका बाजूला ठेवून लोकशाही अधिक मजबूत व्हावी, याकरिता ईव्हीएम हटाव मोहीम राबवत आहोत. निवडणूक निःशंकपणे पार पाडाव्यात, यासाठी नागरिकांचीही मागणी बॅलेट पेपरसाठी आहे. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, हे स्वाक्षऱ्याचे अर्ज प्रशासनाकडे देण्यात येणार आहेत."