पुणे : मोफत लसीकरण करण्याचा फलक पाहून सकाळपासून लस घेण्यासाठी उभ्या असलेल्या नागरिकांना अचानक लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा प्रकार गाडीखाना दवाखान्यात सोमवारी सकाळी घडला. संतापलेल्या नागरिकांनी दवाखान्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध केला.
नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सत्ताधारी भाजपाच्या पंधरापेक्षा अधिक नगरसेवक, कसबा मतदार संघाचे पदाधिकारी यांची नावे असलेला भलामोठा फलक दवाखान्याच्या आवारात लावण्यात आलेला आहे. मोफत लसीकरण सुरू असलेल्या दवाखान्याची नावे त्यावर देण्यात आली असून नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा फलक वाचून अनेक नागरिक लसीकरणासाठी दवाखान्यात आले होते.
अनेकजण लसींचा तुटवडा असल्याने लवकर नंबर लागावा या उद्देशाने तसेच उन्हाचा त्रास नको म्हणून सकाळी लवकर येऊन थांबले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची संख्या अधिक होती. परंतु, या नागरिकांना अचानक गाडीखाना दवाखान्यात लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले. या केंद्रावर लसीकरण होणार नसल्याचा फलक याठिकाणी लावण्यात आल्यानंतर नागरिक संतापले. नागरिकांना उन्हातान्हात हेलपाटे का मारायला लावता, असा सवाल उपस्थित करीत दवाखान्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. प्रशासन आणि पालिकेविरोधात नागरिकांनी यावेळी घोषणाबाजी केली.
एकीकडे शहरातील लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे अनेक केंद्र बंद असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.