अवसरी बुद्रुक: गावातील संपूर्ण कचरा गोळा करुन गावानजीकच असलेल्या स्मशानभूमीजवळ टाकण्यात येताे. ग्रामपंचायतीने त्याच ठिकाणी कचरा डेपो केला असून विल्हेवाट लावण्यासाठी दिवसाआड तो कचरा जाळला होता. त्याचा धूर मुख्य बाजारपेठेसह ग्रामस्थांच्या घरात जात आहे. त्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहे. कचरा डेपो जवळ असल्याचे त्याच्या दुर्गंधीचा त्रासही सहन करावा लागत असून हा डेपो इतरत्र हलवण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
अवसरी बुद्रुक गावठाण अंतर्गत ब्राम्हण आळी, धनगर आळी, सुतार आळी, कुंभारवाडा व मुख्य बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात रिकाम्या जागेत कचऱ्याचे ढीग साचत होते. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. पावसाळ्यात तर कचरा कुजून घाणीचे साम्राज्य पसरत असल्यामुळे ग्रामपंचायतीने घंटागाडी घेण्याचा निर्णय घेतला व घंटागाडी घेतल्यानंतर घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम चालू झाले. साठलेला कचरा स्मशानभूमीलगत गावच्या ओढ्याशेजारी मोठा खड्डा घेऊन कचरा साठविला जातो व दिवसाआड कचरा पेटवून दिला जातो. परंतु स्मशान भूमीलगत १५ ते २० घरांची वस्ती आहे व या पेटवलेल्या कचऱ्याचा धूर मुख्य बाजारपेठ व स्थानिक रहिवाश्यांच्या घरात जाऊन नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांनी ग्रामपंचायतीकडे कचरा डेपोची जागा बदलण्यासाठी वारंवार मागणी करत आहे परंतु ग्रामपंचायत कोणतीही दखल घेत नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत सरपंच पवन हिले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संगितले की, गावाच्या बाहेर पर्यायी जागा शोधून कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल तोपर्यत ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
गॅस्ट्रोसदृश्य आजाराची शक्यता
कचरा डेपो ओढ्यालगत असल्याने कचऱ्याचे ढिगातील काही कचरा वार्याने ओढ्याच्या पाण्यात तसेच कुंभारवाडा वस्ती येथील पिण्याच्या पाण्याच्या विहरीत जात आहे. त्यामुळे पाणी दुषित झाले असून गॅस्ट्रोसदृश आजाराची शक्यता बळावली आहे. ग्रामपंचायतीने तातडीने कचरा डेपोची जागा बदलावी. अन्यथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देणार असल्याचे स्थानिक महिलांनी व सामाजिक कार्यकर्ते उमेश शिंदे यांनी संगितले.
१४ अवसरी
स्मशानभूमीनजीक असलेल्या कचरा डेपोतील जाळलेला कचरा.