वाघापूर : पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथील गावात ड्रोनच्या साहाय्याने गावठाणाचे सर्वेक्षण काही महिन्यांपूर्वी केले होते. त्याची सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता सोनोरीच्या नागरिकांना घराचे प्रॉपर्टी कार्ड लवकरच मिळण्याची चिन्हे आहेत. राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याने राज्याच्या इतिहासात सोनोरी गावचे नाव होणार असून, त्याबाबत उत्सुकता आहे.
राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या हस्ते ड्रोनच्या सहायाने सर्वेक्षण करण्यात आले होते. पूर्वी एखाद्या भागाचे सर्वेक्षण अथवा मोजणी करण्यासाठी वर्षानुवर्षे लागत होती. त्यातूनही पूर्ण खात्री देता येत नव्हती. परंतु काळानुसार त्यात बदल झाले असून आता अगदी कमी काळात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कमी मनुष्यबळाच्या जोरावर काही काळातच काम करणे शक्य झाले आहे. त्याचे उदाहरण म्हणजे ड्रोनच्या सहाय्याने संपूर्ण भागाचे फोटो आणि चित्रीकरण करणे शक्य झाले आहे. तसेच या माध्यमातून गावठाणचे सर्वेक्षण केले जाणार असून त्यामुळे नागरिकांना आता आपल्या घराचे उतारे अधिक पारदर्शक मिळणार आहेत. तसेच सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्या घराला आतापर्यंत बँकेने कधीच कर्ज दिले नाही, त्याच घराला प्रॉपर्टी कार्डमुळे लाखो रुपये कर्ज मिळण्यास मदत होईल. गावाचा संपूर्ण नकाशा आणि त्यावर आपले घर कोठे आहे, हेसुद्धा घरबसल्या कळणार आहे.तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, भूमी अभिलेखचे उपसंचालक किशोर ढवळे, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, दिवे पंचक्रोशीचे माजी सरपंच राजाभाऊ झेंडे, ह. भ. प. सर्जेराव काळे, पुरंदरचे भूमी अभिलेख उपाधीक्षक रवींद्र पिसे, शिरस्तेदार एन. व्ही. वाडकर, सरपंच सुरेखा काळे, उपसरपंच नितीन काळे, ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, कविता काळे, पुष्पा काळे, तेजश्री माकर, अलका काळे, सोसायटी अध्यक्ष विलास काळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दीपक झेंडे, मंडलाधिकारी मनीषा भुतकर, तलाठी लोहार, संतोष कुंभारकर, तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे सर्वेक्षण केले होते.सर्व्हे यशस्वी झाल्यास राज्यातील सर्व ३० हजार गावठाणांचे सर्वेक्षण होणार आहे. म्हणून या मोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या माध्यमातून घरे, मैदाने, मंदिरे, रस्ते, दुकाने, अंतर्गत रस्ते, साधी घरे, मोठ्या इमारती, रिकाम्या जागा त्यांचे क्षेत्रफळ केवळ गावठाणमधील मोजणी करणार आहे. तसेच त्यानंतर त्यातील सूचना, हरकती झाल्यानंतर पुन्हा तपासणी व सर्व माहिती अद्ययावत झाल्यानंतर प्रत्येक घरमालकाला अधिकृत सनद व प्रॉपर्टी कार्ड देणार आहे. हे कार्ड मिळाल्यानंतर आपल्या जागेचे बाजारमूल्य आपोआप वाढणार आहे. विविध योजना, बँकेतून अर्थसहाय्य मिळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. कोण वंचित राहिले असल्यास तेही समजणार आहे. नोंदविलेले घर अथवा गोठा, बंगला आपलाच आहे का, तेही समजणार आहे.पुणे जिल्ह्यातील १० गावांच्यानागरिकांना मिळणार प्रॉपर्टी कार्डसोनोरी गावठाणाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर इतर तालुक्यांतील एकूण १० गावांच्या गावठाणाचे सर्वेक्षण करणार आहे. यामध्ये ज्या गावांची लोकसंख्या २००० च्या पुढे येत असल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा १९६६ च्या कलम १२२ नुसार या गावांच्या गावठाणातील क्षेत्रांचा समावेश गावठाणचा समावेश भूमापनाच्या प्रयोजनासाठी समाविष्ट केला जाईल. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आदेश दिले असून त्यानुसार सर्वेक्षणासाठी पैसेही दिले आहेत. ती गावे व क्षेत्र हेक्टर व आरमध्ये अशी : १) सोनोरी - पुरंदर (०६.२३ हे.) २) माळेगाव - बारामती (०६.८४ हे.) ३) नायफड - खेड (०२.५५ हे.) ४) लाकडी - इंदापूर (०२.८४ हे.) ५) कुर्डेगाव - हवेली (०६.५१ हे.) ६) शिवरे - भोर (०३. ८५ हे.) ७) उंडवडी - दौंड (४०. ०९ हे.) ८) कासारी - शिरूर (०२. ७९ हे.) ९) उरवडे - मुळशी (३०. ९८ हे.) १०) सोमाटणे - मावळ (०३. ६१ हे.)