पुणे : मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असून, ग्रामीण भागात मान्सूनपूर्व शेती कामांना वेग आला आहे. परंतु सध्या जिल्ह्यात असलेल्या लाॅकडाऊन व वेळेच्या मर्यादेमुळे शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून अखेर बुधवार(दि.19) पासून शहर आणि जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र, खते, बि-बायाणे व कीटकनाशके,औषधांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान हाॅटस्पाॅट गावांतील दुकानाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे देखील देशमुख यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने शेतकर्यांनी पेरणी पूर्व तयारी ची कामे देखील सुरू केली आहेत. शेतकऱ्यांना बी बियाणे आणि रासायनिक खते देण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी ग्रामीण भागातील खते बी-बियाणे आणि कीटकनाशकांची दुकाने आता दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी राहतील.सध्या हाय अलर्ट आणि हॉटस्पॉट नसलेल्या गावांमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी दुकाने उघडी ठेवण्याची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आहे. मात्र खते बी-बियाणे आणि कीटकनाशकांची दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहू शकतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले.
पुणे शहरामध्ये ही रासायनिक खते बी-बियाणे आणि कीटकनाशकांच्या दुकानांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात संदर्भातील आदेश महापालिका आयुक्तांच्या स्तरावरून काढला जाणार आहे. शेतकऱ्यांना पेरणी पूर्वतयारीसाठी बी बियाण्यांची खरेदी तसेच रासायनिक खतांचा पुरवठा तसेच खरेदी यासाठी ही वेळ वाढवण्यात आली आहे.---------शेतकऱ्यांची अडचण दूर होईल सध्या संपूर्ण जिल्ह्यात खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. परंतु लाॅकडाऊन व दुकानांच्या वेळेमुळे शेतक-यांना आवश्यक बी-बियाणे व खते मिळण्यास प्रचंड अडचण निर्माण होत होती. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना वेळेत बि-बियाणे व खते उपलब्ध होतील.- बाबुराव वायकर, कृषी सभापती जिल्हा परिषद