पुणे : गणेशोत्सवाच्या काळात प्रामुख्याने शहराच्या मध्यवस्तीमध्ये स्वच्छतेसाठी खास अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये शहरामध्ये दोन शिफ्टमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असून, पहाटे ४ वाजेपर्यंतच शहर चकाचक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी महापौरासह आयुक्त सौरभ राव व सर्व विभाग प्रमुख शहराच्या स्वच्छतेसाठी मध्यरात्री नाईट व्हिजीट करुन पाहणी करणार असल्याची माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली. उत्सवकाळात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरते. ती अस्वच्छता तातडीने दूर करण्यासाठी व स्वच्छता राखण्यासाठी पालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. तीन पाळ्यांमध्ये स्वच्छतेच्या कामांचे नियोजन केले असून, रात्रीच्या वेळी दोन पाळ्यांमध्ये काम होणार आहे. यामध्ये कसबा पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, शिवाजीनगर आदी परिसरामध्ये गणेशोत्सवाच्या काळात स्वच्छता करण्यासाठी तब्बल ५५० ते ६०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मार्फत रात्री १२ नंतर देखावे बंद झाल्यावर त्वरीत स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार आहे. प्रत्येक भागात ही स्वच्छता होती किंवा नाही यासाठी वरीष्ठ अधिकारी मध्यरात्री दौरा करून पाहणी करणार आहेत. ----------------------पहिल्याच दिवशी दहा हजार रुपयांचा दंड गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरभ राव यांनी मनाचे पाच गणपती आणि मंडई परिसरामधील स्वच्छतेची पाहणी केली. यामध्ये मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. यामुळे आयुक्तांनी तातडीने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे व नियमित स्वच्छता करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंडई परिसराची स्वच्छता करण्याची जबाबदारी असलेल्या मे.बाप्पू एन्टप्रायजेस यांना तब्बल १० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
गणेशोत्सवात पहाटे ४ पर्यंत शहर होणार चकाचक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 6:51 PM
गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक भागात ही स्वच्छता होती किंवा नाही यासाठी वरिष्ठ अधिकारी मध्यरात्री दौरा करून पाहणी करणार आहेत.
ठळक मुद्दे'' नाईट व्हिजीट'' मध्ये अस्वच्छता आढळल्याने ठेकेदाराला दहा हजारांचा दंड