राजगुरुनगर : ‘साहेब, पोराच्या शाळेची तीन महिन्यांची फी रखडली आहे, शाळा मागे लागलीय. त्याला सहलीलाही पाठवता नाही आले म्हणून हिरमुसले होते.’ ‘किराणावाला आता उधार द्यायला तयार नाही.’ ‘दिवाळी कोरडीच गेली, पण आता रोजचं अन्नही मुश्कील व्हायला लागलेय.’ङ्घङ्घङ्घ‘बाकी खरेदी सोडा, आता भाजी घ्यायचीही ऐपत राहिली नाही.’ राजगुरुनगर नगर परिषदेचे कामगार त्यांच्या व्यथा सांगत होते. पाचवा महिना आला, तरी कामगारांचा पगार अद्यापही झाला नसून, प्रशासन याबाबत ढिम्म आहे. ग्रामपंचायतीची नगर परिषद झाली आणि कामगारांवर संक्रांत आली. दोन- तीन महिने कामगारांनी तग धरला, पण आता अगदी मेटाकुटीला आले आहेत. हातावर पोट असल्याने फारशी बचत असण्याचा प्रश्न नव्हता. उधार-पाधार करूनही झाले. सोनेनाणे संपले. कर्ज तरी किती काढणार? पगार मिळणे एवढाच पर्याय त्यांच्यासाठी शिल्लक राहिला आहे. कामावर असलेल्या कामगारांपेक्षा कामावर नसलेल्या कामगारांची वाईट स्थिती आहे. त्यांना पगार तर नाहीच, पण काम शोधण्याची नामुष्की आली आहे. मोलमजुरी करणे एवढाच पर्याय त्यांच्याकडे शिल्लक आहे. ते कामही सहज मिळत नाही. कोर्ट कचेऱ्या करून काही निकाल लागेल एवढ्या आशेवर ते आहेत. खेड तालुका धोरण विकास समितीचे अध्यक्ष नीलेश कड पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन कामगारांच्या नियुक्तीचा विषय शासनाकडे तत्काळ निर्गमित करावा आणि तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना कामावर राहू द्यावे, अशी मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रशासकांचा स्वयंस्पष्ट अहवाल मागविला होता, पण पुढे काही कार्यवाही झालेली नाही. कड पाटील आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश कौदरे यांनी कामगारांचा चार महिन्यांचा रखडलेला पगार त्वरित करण्यात यावा, अशीही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. (वार्ताहर)
नगर परिषद झाली आणि कामगारांवर आली संक्रांत
By admin | Published: December 25, 2014 11:17 PM