श्रीकिशन काळे
पुणे: गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने पुणेकर हैराण झाले आहेत. कधी काळी थंड हवेचे शहर असलेले पुणे आता उष्ण बेट बनले आहे. ऐन लोकसभा निवडणूक प्रचार काळात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत आहे, तरीही कोणताही उमेदवार या तापलेल्या पुण्यावर बोलायला तयार नाही. उकाड्याने हैराण झालेले पुणेकर म्हणताहेत, ‘ओ... भाऊ, अण्णा, पुण्याच्या तापमानावर बाेला ना!’.
विदर्भात ज्या प्रकारे उन्हाचा कडाका जाणवतो, तोच अनुभव आता पुण्यात येत आहे. त्यामुळे तापलेले पुणे यावर भावी खासदारांनी बोलणे आवश्यक असून, पुण्याला थंडगार शहर बनविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
सध्या शहरात सर्वच उमेदवारांच्या रॅली, सभा, भेटीगाठी, पदयात्रा सुरू आहेत. कडक उन्हामुळे मतदानावर परिणाम होईल, अशीही चर्चा सुरू आहे. नागरिकांना घाम फुटत असतानादेखील एकही उमेदवार यावर बोलायला तयार नाही. दरम्यान, जो उमेदवार पुण्याच्या पर्यावरणावर काम करेल, त्याला आम्ही मतदान करू, असा निर्धार पुणेकरांनी केला. त्यावर उमेदवारांनी आश्वासनही दिले, पण त्यांच्या प्राधान्यक्रमात पर्यावरण हा विषयच नाही, हे पाहून अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, भविष्यात पुणे राहण्यालायक शहर कसे राहणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आताच पुण्यातील तापमानामुळे नको-नको वाटत आहे, असेही अनेकांनी सांगितले.
...तरीही काेणी का बाेलत नाही?
पुण्याचे हीट आयलॅंड झाले आहे, यंदा एप्रिल महिन्यात कमाल तापमान ४३ अंशांवर गेले आहे. मे महिन्यातही हेच चित्र आहे. भर उन्हातही उमेदवारांचा प्रचार सुरूच आहे. त्यातच किमान तापमानही वाढल्याने रात्रदेखील उष्ण झाली आहे. परिणामी सायंकाळी सभा घेण्यावर भर दिला जात असला, तरी उकाडा होत असल्याने नागरिकांची गैरसाेय हाेत आहे. एवढे होत असतानादेखील एकही पक्ष या विषयावर का बोलत नाही?, याची खंत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत.
शहरातील वास्तव काय?
१) शहराचे दोन भाग झाले आहेत, एक भाग पूर्व आणि दुसरा पश्चिमेचा. पूर्व भागात प्रचंड तापमान नोंदवले जात असून, पश्चिम भागात त्यामानाने कमी नोंद.२) पुणे क्लायमेट ॲक्शन प्लॅनवर कोणीही बोलत नाही. हा आराखडा केवळ कागदावरच आहे. पुणे नॉलेज सेंटरच्या वतीने असा आराखडा यापूर्वी तयार केला आहे.३) वडगावशेरी, मगरपट्टा, हडपसर, कोरेगाव पार्क अधिक उष्ण, तर शिवाजीनगर, पाषाण, एनडीए, कोथरूड या भागांत कमी तापमानाची नोंद.
काँक्रिटीकरणाचे तोटे
१) पुण्यातील बहुतांश भागांमध्ये इमारती आणि रस्ते काँक्रिटीकरणाचे बनले आहेत. सिमेंटचे रस्ते तापत आहेत आणि ते थंड होण्यास वेळ लागत आहे. परिणामी तापमानात सातत्याने वाढ हाेत आहे.२) काँक्रिटीकरणामुळे पावसाचे पाणी मुरत नाही. ते पाणी एका ठिकाणी साठत आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी डेक्कन येथे पूरस्थिती निर्माण झाली. पावसाचे पाणी मुरावे, यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
का वाढतेय तापमान?
१) उष्णता साठवणारे सिमेंटचे रस्ते, इमारती तयार.२) वाहनांची संख्या वाढल्याने त्यातून गरम हवा वातावरणात.३) इमारतींना काचेचे प्रमाण अधिक असल्याने सूर्यकिरणे परावर्तित होताहेत.४) सिमेंटच्या रस्त्यांचे प्रमाण अधिक.५) रस्त्यांसाठी झाडांवर कुऱ्हाड.
शहरातील समस्या काय?
१) पुण्यातील हवेचे प्रदूषण सतत वाढतेय.२) वाहनांची संख्या वाढतेय.३) शहरातील झाडांची संख्या कमी होतेय.४) बांधकामांमुळे धुळीचे प्रमाण वाढतेय.५) सिमेंटीकरणाचा परिणाम.६) एसीमधून गरम हवा वातावरणात.
रात्रीचे पुणे बनलेय उष्ण !
(गेल्या काही वर्षांतील किमान तापमान)
एप्रिल २०१३ - २३.६एप्रिल २०१४ - २५.६एप्रिल २०१५ - २४.५एप्रिल २०१६ - २५.२एप्रिल २०१७ - २५.७एप्रिल २०१८ - २५.२एप्रिल २०१९ - २५.९एप्रिल २०२० - २४.५एप्रिल २०२१ - २३.१एप्रिल २०२२ - २५.४एप्रिल २०२३ - २२.२एप्रिल २०२४ - ३०.१
दिवसाही पुणेकरांना घाम !
१ मे २०२४ - ३८.९२ मे २०२४ - ३९.७३ मे २०२४ - ४०.०४ मे २०२४ - ३९.६५ मे २०२४ - ४०.०