लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेतील बांधकाम परवाना विभागाला नवनियुक्त आयुक्तांनी रान मोकळे करून दिले आहे. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव, दिनेश वाघमारे यांनी आपल्या अधिपत्याखाली घेतलेल्या बांधकाम परवाना विभागाचे नवीन आयुक्तांनी विकेंद्रीकरण केले आहे. त्यामुळे कोणत्याही फायली यापुढे आयुक्तांकडे जाणार नाहीत. चार हजार चौरस मीटरपुढील सर्व बांधकामांना परवाना देण्याचे अधिकार आयुक्तांनी सह शहर अभियंत्याला प्रदान केले आहेत. बांधकाम परवाना आणि नगररचना विभाग हा नेहमी चर्चेत असतो. ‘लोकमत’ने बांधकाम परवाना विभागात फायली क्लीअर करून घेण्यासाठी बिल्डर आणि अधिकारी स्टिंग आॅपरेशन केले होते. ‘रात्रीस खेळ चाले...’ या वृत्ताने खळबळ उडवून दिली होती. बेलगाम अधिकारी आणि कर्मचारी यांचा कारभार उघडकीस आणला होता. परवानगीचे अधिकार पूर्वी महापालिका आयुक्तांकडे होते. मात्र, तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी महापालिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर बांधकाम परवानगी विभागाचे शुद्धीकरण केले. दोन हजार चौरस मीटरपर्यंत परवाना देण्याचे अधिकार उपअभियंता, चार हजार चौरस मीटरपर्यंत परवानगी देण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता, तर चार हजार एक चौरस मीटरपुढील परवाना देण्याचे अधिकार शहर अभियंत्यांकडे सोपविले होते. सहशहर अभियंता अयुबखान पठाण यांच्याकडे बांधकाम परवानगी, अवैध बांधकाम नियंत्रण विभाग आणि अतिक्रमण मुख्य कार्यालय या विभागांचे कामकाज सोपविले आहे.
‘बांधकाम’चा भार सह शहर अभियंत्यांवर
By admin | Published: May 23, 2017 5:13 AM