नीलेश राऊत
पुणे : शहराबाहेरील लसीकरण केंद्र निवडल्यास लवकर नावनोंदणी होऊन, लसीकरणासाठी वेळही मिळत आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील वर्ग सध्या शहरापासून ६०/७० किलोमीटरवर जाऊन लस घेण्यास पसंती देऊ लागला आहे. यात विशेष म्हणजे, भोर वेल्हा, मावळ, मुळशी येथील डोंगरी भागातील लसीकरण केंद्रांवर लागलीच कोविन अॅपमध्ये वेळ मिळत असल्याने, लसीकरणाबरोबरच लॉकडाऊनच्या काळात पर्यटनही होत असल्याने आता या भागाकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे़
१८ ते ४४ वयोगटातील वर्गाला लस घेण्यासाठी कोविन ॲपवर नावनोंदणी आवश्यक आहे. शहरात या वयोगटातील वर्गासाठी काही निवडक लसीकरण केंद्रांवरच लस दिली जात आहे. परंतु, कोविन ॲपवर नावनोंदणी करताना संबंधित वेळेत ॲप सुरु करून मोबाईल क्रमांकाची नोंद व ओटीपी येईपर्यंत, लस मिळणाऱ्या लसीकरण केंद्रांवरील त्या दिवसाचा कोटा भरलाही जात आहे़ त्यातच पुढील काही दिवसांत लस येईलच का, याची शाश्वती नाही. अशावेळी शहराबाहेरील ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र निवडणे सध्या सोयीचे ठरत आहे.
-------
रेंज नसल्याने होत नाही नावनोंदणी
डोंगरी भागात मोबाईलला रेंज नसल्याने, तसेच नेटवर्क वारंवार जात असल्यामुळे, तेथील नागरिकांना ( १८ ते ४४ वयोगटातील) आपल्याच भागातील केंद्रात नावनोंदणी करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. वेळेत ओटीपी न येणे, नावनोंदणी अंतिम टप्प्यात आल्यावर नेटवर्क डिसकनेक्ट होणे आदी समस्यांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. तर, दुसरीकडे शहरी भागात बसून, डोंगरी भागातील तसेच ६०/७० किलोमीटर अंतरातील ग्रामीण भागातील केंद्र निवडून सहज नोंदणी व लसीकरणाची वेळ मिळत आहे. त्यामुळे भोर वेल्हासह आदी लगतच्या तालुक्यातील अनेक गावांत स्थानिकांऐवजी शहरातील नागरिकांचीच गर्दी होत चालली आहे़
------
जिल्हा परिषदेकडून ऑनलाईन नोंदणी रद्द करण्याची मागणी
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष मोबाईलला जेथे रेंज मिळत नाही अशा सर्व ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांकरिता शहरी भागातून मोठ्या प्रमाणात बल्कने नोंदणी होत आहे़ परिणामी संबंधित केंद्र परिसरातील नागरिकांना लसीकरणापासून ऑनलाईन नोंदणीच्या अटीमुळे वंचित राहावे लागत आहे़
त्यामुळे या मोबाईलवर ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नसलेल्या भागांमध्ये १८ ते ४४ वयोगटाकरिताची ऑनलाईन नोंदणी रद्द करावी़ अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच राज्याच्या आरोग्य विभागाकडे केली आहे़
-------------------