पुणे : शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये दिवसाला साधारणत: साडेतीनशे मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असून, गेल्या पंधरा दिवसांत ही गरज २५ ते ३० टनाने वाढली आहे़ त्यामुळे सध्या होणारा पुरवठा व मागणी यातील तफावत वाढल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला आहे़
शहरातील खाजगी रूग्णालयांना सुमारे ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असून, महापालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये ४४ ते ४५ टन ऑक्सिजन लागतो़ पंधरा दिवसांपूर्वी शहराला ३६० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता़ त्यावेळी शहराच्या सर्व प्लांटमधून ऑक्सिजन मिळण्यासाठी प्रयत्न होत होते़ परंतु, आजमितीला शहरात दहा हजाराच्या आसपास रूग्ण हे ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असल्याने सर्व रूग्णालयांना साधारणत: ३७५ मेट्रिक टनची गरज पडत असून, ती पुरवठादारांकडून पूर्ण होत नसल्याने शहरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे़