पुणे : महानगरपालिकेने पार्किंग धोरणाचा विषय सादर केल्यानंतर शहरात विविधस्तरांतून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. प्रत्येक नागरिकाशी निगडीत हा प्रश्न असल्याने या कराची तुलना जिझिया कराशी करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसपासून ते खासगी दुचाकी-चारचाकी वाहने देखील त्याच्या कचाट्यात येणार आहे. या प्रश्नावर चर्चेचा आणि मतमतांतराचा कल्लोळ आत्ताच सुरु झाल्याचे लोकमत पाहणीत दिसून आले.महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पार्किंग धोरणाचा विषय महापालिकेच्या स्थायी समितीत मान्यतेसाठी ठेवला होता. त्यात त्यांनी रस्त्यावरील पार्किंगच्या शुल्काबाबतही भाष्य केले आहे. त्यावरच न थांबता रात्री निवासी वसाहतीतील महापालिकेच्या रस्त्यांवर लावण्यात येणा ऱ्या वाहनांचा देखील त्यात विचार केला आहे. त्यांना देखील शुल्काच्या कक्षेत आणले आहे. शहराची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३१ लाख १५ हजार इतकी आहे. शहर आणि परिसरात २०१७ पर्यंत ३५ लाख ५० हजार वाहनांची नोंदणी झाली आहे. सरासरी दररोज ५०० ते ७०० नवीन वाहनांची भर पडत आहे. मध्यवर्ती पेठांतील वाडे आणि उपनगरांमधील बांधकामांची रचना पाहिल्यास खासगी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ बहुतांश ठिकाणी नाही. झोपडवस्तीतील वाहने देखील रस्त्यांवरच लागतात. अनेक सोसायट्यांमधे वाहनतळ असले तरी ते सदनिकांच्या मानाने पुरेसे नाही. घरटी तीन ते चार दुचाकी असणाऱ्यांचे प्रमाण देखील शहरात मोठे आहे. शिवाय चारचाकी, तीनचाकी, प्रवासी वाहने यांची देखील मोठी संख्या आहे. रात्री शहराचा फेरफटका मारला तरी पीएमपीच्या बसपासून चारचाकी, दुचाकी, तीनचाकी आणि खासगी प्रवासी वाहनांची रस्त्यांवर गर्दी दिसते. रस्ते हेच हक्काचे वाहनतळ झालेले आहे. कात्रज, धनकवडी, आंबेगाव, वडगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसर, हडपसर, येरवडा, कोथरुड आणि औंधचा काही भाग, मध्यवर्ती पेठा असे सर्वच भाग या पार्किंग कल्लोळात येतात. महापालिकेने निवासी पार्किंगसाठी रात्री १० ते सकाळी आठ या दहा तासांसाठी वाहन प्रकारानुसार ४ हजार ५६२ ते १८ हजार २५० रुपये असा वार्षिक पासचा दर प्रस्तावित केला आहे. घरटी दोन ते चार वाहने असण्याचे प्रमाण जास्त असल्याने प्रत्येक कुटुंबावर त्या प्रमाणात वार्षिक ९ ते १८ हजार रुपयांचा पार्किंग शुल्काचा भार पडणार आहे. त्यामुळे लोकभावना या पार्किंग शुल्काच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे.
शहर पार्किंग कल्लोळाच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:35 PM
महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पार्किंग धोरणाचा विषय महापालिकेच्या स्थायी समितीत मान्यतेसाठी ठेवला होता.
ठळक मुद्देमहापालिकेचे पार्किंग धोरण : पार्किंग आकारणी म्हण जिझिया कर असल्याची टीका लोकभावना या पार्किंग शुल्काच्या विरोधात