पुणे : शहरात निर्माण होणारा ओला कचरा ७० टक्के वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे महापालिका प्रशासनास शक्य झाले असले, तरी सुका कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे एकही जागा नाही, तर पालिकेच्या कचरा रॅम्प आणि इतर जागाही गेल्या दीड महिन्यापासून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे संपल्या असून, गेल्या तीन दिवसांपासून हा कचरा उचलणे पालिका प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहे. परिणामी शहरात तब्बल दोन ते तीन टन कचरा पडून असून, त्यात प्रामुख्याने कागद आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा समावेश आहे.ग्रामस्थांनी ‘कचरा आंदोलन’ मागे घेऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असला, तरी अद्याप महापालिकेने उरुळी येथील कचरा डेपोवर एकही गाडी पाठविलेली नाही. हे आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर, महिनाभरात उरुळी देवाची अथवा इतर ठिकाणी कचरा टाकण्यासाठी राज्यशासनाकडून जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप एक फूटही जागा मिळाली नसल्याने, शहरातील सुक्या कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. या कचऱ्याचे प्रमाण एवढे मोठे आहे की, शहरात ४५ टक्के सुका कचरा जागच्या जागी पडून असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. यात प्रामुख्याने प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने ते जाळणे; तसेच कुठेही टाकून देणे शक्य नाही. तसेच, त्याची केवळ कॅपिंग मध्येच विल्हेवाट लावणे शक्य असल्याने या कचऱ्याचे काय, हा महापालिकेपुढे सर्वांत मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हा कचरा उचलणे बंद करण्यात आले असून, शहरातील जवळपास ५० टक्के कचरापेट्या ओसंडून वाहत आहेत. हा कचरा रस्त्यावरही आला असून, वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांकडून प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ओला कचरा भरला असल्याने, या कचऱ्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, अनेक ठिकाणी माशा आणि डासांच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.पेठा आणि उपनगरांमध्ये सर्वाधिक ढीग ४शहरात प्रामुख्याने मध्यवर्ती पेठा आणि उपनगरांमध्ये कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व प्रमुख पेठा, तसेच मध्य वस्तीमधील पेठांमध्ये आधीच लहान रस्त्यांवर असलेल्या कचरापेट्या भरून वाहत आहेत. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची समस्याही वाढली आहे, तर उपनगरांमध्ये धायरी, वडगाव शेरी, कात्रज, बावधन, पाषाण, सिंहगड रस्ता, औंध, कोंढवा, हडपसर या परिसरात हा कचरा मोठ्या प्रमाणात पडून आहे. दरम्यान, जागाच नसल्याने सुका कचरा पेटवून दिला जात आहे.
शहरात कचऱ्याचे ‘ढीग’
By admin | Published: February 20, 2015 12:19 AM