पुणे शहरातल्या सध्याच्या रुग्णंसंख्येसाठी पुरेशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे लॅाकडाउन लावु नये अशी भुमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. शहरासाठी चाचण्या वाढवणे, लसीकरण वाढवणे आणि आरोग्य यंत्रणा सक्षम करणे यावर भर देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
पुण्यामध्ये आज ४५ वर्षांच्या वरच्या लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. याच टप्प्यामध्ये महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लस घेतली. त्यानंतर त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करावे असे आवाहन केले आहे.
मोहोळ म्हणाले, देशभरात लसीकरणाचा चौथा टप्पा सुरु होत आहे. पहिल्या तीन टप्प्यात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकही मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. आज चौथा टप्पा सुरु झाला. ४५ वरील नागरिकांना लस दिली. आत १०० टक्के लोकांनी लस घेण्याचे आवाहन मी करत आहे. पुणे शहरात लसीचा तुटवडा नाही. ११४ केंद्रे आहे. ३ लाख ६० हजर नागरिकांना लस देण्यात आली आहे. आजही आपल्याकडे लसीचा साठा चांगला आहे. आपल्याला कालच केंद्र सरकारच्या माध्यमातून १ लाख ४५ हजार लस मिळाल्या आहेत. त्याचेही नियोजन सुरु आहे. पुणे जिल्हा मिळून एक लाख लसीकरणाचे टार्गेट ठेवले आहे. पुढच्या काळात हि संख्या वाढवायची आहे. आज आम्ही दिवसाला १५ हजार लसीकरण करत आहोत.
संख्या वाढली तरी यंत्रणा सक्षम करण्यावर भर पुण्यामध्ये रुग्णसंख्या वाढत आहे असे नाही. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये संख्या वाढत आहे. त्यामध्ये आपले पुणे शहर आहे. शहरात एका दिवसाला १६ हजारांच्या आसपास चाचण्या घेतल्या जात आहेत. त्याचप्रमाणे खासगी रुग्णलायतील ८० टक्के बेड ताब्यात घेण्यात आले आहेत. महापालिकेच्या जम्बो रुग्णालयाची बेड क्षमता चारशेवरून पाचशे केली आहे. ती आम्ही आठशेपर्यंत घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहोत. बाणेरच्या रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनची सुविधा वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. कोव्हीड केअर सेंटरमध्ये ५ हजार बेड वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यामध्येही १५,२०,२५ टक्के बेड ऑक्सिजनचे करू शकतो का याबाबत विचार विनिमय चालू आहे. त्याचप्रमाणे नव्याने व्हेंटिलेटर महापालिका खरेदी करत आहे.
रुग्णसंख्या वाढण्यावर लसीकरण प्रभावी ठरेल रुग्णसंख्या वाढत असली तरी घाबरण्याचे कारण नाही. संसर्गाचा वेग आणि विषाणूचे बदलते स्वरूप पाहिले तर ९० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. १० टक्के लोक रुग्णालयात दिसत आहेत. आता आपण निर्बंध वाढवले असून ते अजून कठोर करण्यावर सध्या विचार सुरु आहे. त्यामुळे हि साखळी तुटू शकते. पुणे शहरात रुग्णसंख्या वाढत असताना लॉकडाऊन हा त्यावर उपाय नाही. आपल्या शहरात लाखो नागरिकांचे हातावर पोट आहे. त्याच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच बेरोजगारी वाढल्याने जनजीवनही विस्कळीत होते. कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, निर्बंध कठोर करावेत आणि लसीकरण वाढवावे या तीन पातळीवर काम केल्यास पुणे शहराला आता तरी लॉकडाऊनची आवशक्यता नाही.
बेडची संख्या वाढवण्यासाठी खासगी बेड ताब्यात घेत आहोत. ससून आणि जम्बो रुग्णालयाचे बेड वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. खासगी रुग्णालयाचे ८० टक्के बेड ताब्यात घेतले आहेत. १००, १५० बेड दीनानाथ, भारती,सिम्बायोसीस अशा रुग्णलयातून ताब्यात घेण्यात आले आहेत. अजूनही हळूहळू खासगी रुग्णालयातून बेड ताब्यात घेण्याचे काम चालू आहे.
केंद्र आणि राज्य सरकारला अधिक लस पुरवठा करण्याची विनंती पुणे शहारत ९०० रुग्णालये आहेत. आता सद्यस्थितीत ११४ लसीकरण केंद्र सुरु आहेत. जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी पुण्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अधिक लसींचा पुरवठा केल्यास दोन महिन्यात पुणे शहराचे लसीकरण पूर्ण होईल. त्यासाठी प्रकाश जावडेकर यांनाही आम्ही विनंती केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसी उपलब्ध होणार आहेत.
राज्य सरकारने गेल्या वर्षभरात पुणे महानगरपालिकेला एकही रुपया दिला नाही. हि सत्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत मला कोणावर आरोप करण्याची इच्छा नाहीये. म्हणूनच सगळ्यांनी एकत्र मिळून काम करूयात. पुणे महानगरपालिकेला सरकारने अर्थसहायय करावे. नाहीतर पालिकेचे बजेटही कोलमडून जाईल. आतापर्यंत २००, २५० कोटी खर्च झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आमचा विचार करावा. पुणे महानगरपालिका खर्च उचलण्यास समर्थ आहे.