पुणे- शहरात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिलाय. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. उद्या ही शहराच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ झाले होते. काही ठिकाणी सकाळी पावसाचा शिडकावा झाला. दुपारी 4च्या सुमारास वारजे, कोथरूड, वानवडी, सिंहगड रोड परिसरात हलक्या सरी आल्या. 10 ते 15 मिनिटे हा पाऊस सुरू होता. हिंजवडी, पुणे स्टेशन परिसरात त्याचा जोर होता. रात्री उशिरा लॉ कॉलेज रोड, गोखलेनगर, शिवाजीनगर परिसरात पावसाची हलकी सर येऊन गेली. या पावसाने शहरातील तापमानात वाढ झाली असून सोमवारी किमान तापमान 20 अंश सेल्सियस नोंदवले गेले. उद्याही पावसाच्या काही सरी येण्याची शक्यता आहे.पुणेकरांची दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे दाणादाण उडालेली आहे. संध्याकाळी पावसाने उघडीप दिल्यावर जिल्ह्यातील विविध गावांमधून विक्रीकरिता मार्केट यार्ड येथे आणलेली भाजी पुन्हा पाऊस सुरू झाल्यावर भिजून खराब झाली. अनेक शेतक-यांनी त्यांची भाजी गाळ्याबाहेर ठेवलेली होती. या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर कांदा-बटाटा मार्केटमधील गाळ्याबाहेर ठेवण्यात आलेला मालही मोठ्या प्रमाणावर खराब झाला. गाळे मालक आणि शेतक-यांनी ताडपत्री, प्लॅस्टिक कागद तसेच हाती लागेल त्या वस्तूंनी भाज्या व शेतीमाल झाकण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू राहिल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा माल खबरदारीचा उपाय म्हणून टेम्पो आणि ट्रकमध्येच ठेवला होता.सातारा रस्ता, बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रस्ता पाण्याखाली गेला होता. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. त्यामुळे वाहनचालकांची त्रेधा उडाली होती. पावसाचे पाणी गेल्याने अनेक वाहने बंद पडली होती. अनेक जण त्यांच्या दुचाकी ढकलत जात असताना दिसत होते.
पुणे शहराला जोरदार अवकाळी पावसाचा तडाखा, भाज्यांनाही बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 12:33 AM