पुणे : वर्क फ्रॉम होम, विविध विषयांचे क्लासेस, विविध संघटनांच्या सभा, कार्यशाळा, वधू-वर सूचक केंद्रांची माहिती, एमपीएससी- यूपीएससीचे क्लासेस यांसारख्या जाहिरातींनी पीएमपीएमलचे बसस्टॉप, सार्वजनिक भिंती विद्रूप झाल्या असून, महापालिकेडून यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे महापालिकेने अशा जाहिरातींसाठी मोफत जागा उपलब्ध करून दिल्यात की काय अशी शंका निर्माण होत आहे. ‘स्वच्छ पुणे सुंदर पुणे’ असे जरी महापालिकेचे ब्रीदवाक्य असले तरी ठिकठिकाणी अशा प्रकारच्या जाहिराती लावल्या जात असल्याने पुणे खऱ्या अर्थाने सुंदर राहिले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विजेचे डीपी, बसस्टॉप्स, सार्वजनिक भिंती यांवर अशा विविध जाहिराती चिटकवलेल्या सर्रास आढळतात. असेच चित्र संपूर्ण शहरभर असून यावर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिक विचारतायेत. महापालिकेने विविध महत्त्वाच्या संस्था, महापालिकेची उद्याने, नाट्यगृह यांच्याबाहेर त्या ठिकाणांबद्दल माहिती देणारे फलक लावले आहेत. अशा फलकांवरही अशा जाहिराती लावलेल्या आढळून येत आहेत. जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानाचे ठिकाण दर्शवणाऱ्या फलकावरही अशा प्रकारच्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बीएमसीसी रस्त्यावरील एका नो पार्किंगच्या फलकावर जाहिराती लावण्यात आल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. (वार्ताहर)
बेकायदा जाहिरातींमुळे शहर विद्रूप
By admin | Published: December 26, 2016 3:46 AM