पिंपरी : शहराची जीवनशैली हळूहळू बदलली. त्याप्रमाणे महामार्गावर वाहनांच्या संख्येतही भर पडत गेली. वाहनांची संख्या १० लाखांच्या घरात गेली. वृक्षांच्या संख्येत मात्र घट झाली. शहरात सध्या हरितपट्टा फक्त २८ टक्के उरला आहे. वृक्षसंवर्धन व उद्यान विभागाने ग्रीन सिटीच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांमधील पाणी नमुन्यांचे अहवाल पर्यावरण विभागाने गतवर्षी तपासले. पवना नदीत सर्वांत जास्त प्रदूषण दापोडी, कासारवाडी व थेरगाव, तर इंद्रायणी नदीच्या भागात चिखली, सस्तेवस्ती, तसेच पिंपळे निलख भागात निर्धारित मानकांपेक्षा जास्त आढळून आले आहे. मोशी भागातील तळ्यामध्ये सर्वांत जास्त प्रदूषण आढळून आले आहे. यावरून या भागात पाणीप्रदूषण वाढले आहे, हे स्पष्ट होते. दर वर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते. मात्र, ते पूर्ण करण्यात उद्यान विभाग अपयशी ठरतो. २०१४-१५ला २० लाख लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ३४ हजार वृक्ष शहरात लावले गेले. त्यामुळे शहरात पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपणाला खोडा बसला आहे. वृक्षगणना १२ वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर वृक्षगणनाच झाली नाही. तसेच कोणत्या प्रकारचे शहरात किती वृक्ष आहेत. शहरातील शिल्लक वृक्षाच्या संवर्धनासाठी ठोस पावले उद्यान विभागाने उचलणे आवश्यक आहे. मात्र याबद्दल उद्यान विभागच साशंक आहे. शहरात छोटे-मोठे मिळून ६१७३ उद्योग आहेत. उद्योगनगरी अशी या शहराची ओळख आहे. मात्र, औद्योगिक सांडपाण्यामुळे जैविक व रासायनिक प्रदूषणात वाढ झाली आहे. अविघटनशील कचऱ्यामुळे ई-वेस्टचे प्रमाण जास्त वाढले आहे. त्यामुळे काही विषारी वायू निर्माण झाले आहेत. धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. शहरातून दिवसाला प्रतिटन ७००च्या आसपास कचरा जमा होत आहे. मोशी कचरा डेपोत मर्क्यूरी लेड, कॉपर व निकेल या प्रदूषकांचे प्रमाण वाढले आहे, हे २०१४-१५ च्या पर्यावरण अहवालावरून स्पष्ट आहे.(प्रतिनिधी)साथीच्या आजारांत वाढ प्रदूषण बदलामुळे नागरिकांना पाणी व हवा या माध्यमातून मलेरिया, डेंगी, कावीळ, गॅस्ट्रो व श्वसनसंस्थेच्या विकारांत वाढ झाली. गतवर्षी वाढलेल्या प्रदूषकांमुळे कावीळ व विषमज्वरमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. डेंगीचे २०१४-१५ मध्ये ५१९ रुग्ण आढळून आले आहेत.तापमानात वाढ२००८-०९ला शहराचे तापमान २३-४० अंश सेल्सिअस होते. २०१५पर्यंत हे तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. याची प्रचिती यंदा शहरवासीयांनी अनुभवली. शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दुष्काळाची झळ काही अंशी पिंपरी-चिंचवड शहरात अनुभवायला आली. हे सर्व पर्यावरणबदलाचे द्योतक आहे. शहरात वाहनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्या शहरात हरितपट्टा २८ टक्के आहे तो ३५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे. औद्योगिक २ एमएलडी व इतर २० एमएलडी सांडपाणी नद्यांमध्ये मिसळले जाते. त्यासाठी नवीन ड्रेनेज लाइन बसविण्याचे प्रयत्न आहेत. त्याचप्रमाणे स्मशानभूमीतून होणारे हवाप्रदूषण टाळण्यासाठी विद्युतदाहिनी बसविण्यात आलेल्या आहेत. - संजय कुलकर्णी, पर्यावरण विभागप्रमुखनदीपात्रात धुतली जातात वाहनेतळवडे : येथील इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेकडे पर्यावरण विभागाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच थेट नदीच्या पात्रात वाहने घालून ती धुऊन काढण्याचे धाडस वाहनचालक करीत आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्याची प्रदूषण पातळी वाढत असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमी करीत आहेत.तळवडे येथे इंद्रायणी नदीवर झालेल्या नवीन पुलामुळे पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण औद्योगिक वसाहत जोडली गेली. त्याच पुलापासून थेट नदीपात्रात वाहन उतरवण्यासाठी कच्चा रस्ता आहे. बाराही महिने या रस्त्याने वाहने थेट नदीपात्रात उतरतात नद्यांच्या प्रदूषण पातळीत सातत्याने वाढ होते.
शहरात वाहने वाढली अन् वृक्ष घटले!
By admin | Published: June 05, 2016 3:51 AM