पुणे : पुणेकर प्रवाशांचे सार्वजनिक वाहतुकीचे एकमेव साधन असलेली पीएमपी किती तकलादू आणि नादुरुस्त आहे, याची प्रचिती पुणेकरांना गुरुवारी दिवसभरात आली. शहराच्या विविध भागांमध्ये एक दोन नव्हे, तर तब्बल ११ बस वेगवेगळ्या वेळेला बंद पडल्या. महत्त्वाच्या रस्त्यांवर बंद पडलेल्या या बस हटविण्याची तसदी ना महापालिकेने घेतली ना बसेसच्या ठेकेदारांनी. वाहतूक पोलिसांचे मात्र कोंडी सोडविताना हाल झाले.पीएमपी बंद पडण्याच्या घटना तशा नवीन नाहीत. दिवसाला दोन-चार बसेस बंद पडण्याच्या घटना असतातच; परंतु गुरुवारी मात्र या सर्वांचा कहर झाला. सकाळी अकरा आणि दुपारी सव्वाच्या सुमारास प्रचंड वर्दळीच्या संचेती पुलावर दोन वेळा पीएमपी बंद पडली. याबाबत पीएमपीच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला कळवूनही त्यांनी क्रेन पाठवली नाही. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली. कोंडीत अडकलेल्या वाहनांच्या रांगा थेट पुणे विद्यापीठ चौकापर्यंत गेल्या. वाहतूक पोलिसांनी ग्रेड सेपरेटरमधून ही वाहतूक वळवली. कामगार पुतळामार्गे शाहीर अमर शेख चौकाकडे वाहतूक वळवून कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला; मात्र वाहनचालकांच्या रोषाला पोलिसांनाच बळी पडावे लागले. यासोबतच भैरोबानाला येथे सकाळी पावणेअकरा आणि दुपारी बाराच्या सुमारास बस बंद पडल्या, तर तेथून जवळच असलेल्या एम्प्रेस गार्डन जवळही पीएमपी बस बंद पडली. मालधक्का चौकामध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास बस बंद पडल्यानंतर, त्याचा परिणाम आरटीओ, बंडगार्डन पोलीस ठाणे या रस्त्यांवर झाला. सकाळी सकाळी वाहनांच्या रांगाच रांगा दिसत होत्या. पीएमपीने काही खासगी ठेकेदारांच्याही बसेस भाडेतत्त्वार घेतलेल्या आहेत. ठेकेदारांच्या बसेस बंद पडल्या की पीएमपी त्याकडे लक्ष देत नाही? या बसेस हलविण्यासाठी क्रेनही पाठविण्यात येत नाही, तर ठेकेदारही याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. बसेस नेमक्या हलवायच्या कोणी? या वादात पुणेकरांचा मात्र रस्त्यावर खोळंबा होतो. प्रसंगी वाहतूक पोलिसांनाच क्रेन बोलवावी लागते.
पीएमपीमुळे शहराची कोंडी
By admin | Published: January 08, 2016 1:48 AM