लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अंशत: टाळेबंदीच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने शहरात संपूर्ण टाळेबंदीच जाहीर केली. आहे. यामुळे शहराची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता असल्याने लादलेले नियम तातडीने शिथिल करावेत. राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून कायदेभंग करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे.
“राज्यातील इतर शहरांमध्ये एक नियम आणि पुण्यात वेगळा नियम हे अन्यायकारक आहे. पुण्यात लागू केलेल्या नियमांमुळे पुणेकरांचे जीवनमान ठप्प होणार आहे,” असे खासदार गिरीश बापट म्हणाले. विमान, रेल्वे, एसटी यासह संपूर्ण राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू असताना, मात्र पुण्याची जीवनवाहिनी असणारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसगाड्या अत्यावश्यक सेवा वगळता ३० एप्रिलपर्यंत बंद केल्या आहेत. या बससेवेचा दररोज पाच लाख प्रवासी लाभ घेत असल्याने, ती बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत, असे बापट यांनी सांगितले. महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यावेळी उपस्थित होते.
रात्री आठनंतर संचारबंदी करावी. सर्व व्यावसायिकांना रात्री आठपर्यंत व्यवसायाची मुभा द्यावी. तसेच रात्री आठपर्यंत पीएमपीची बससेवा पूर्ववत करावी, अशी भाजपची मागणी आहे. त्या तातडीने मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून कायदेभंग करावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.